मुंबई - मधुमेह आजारात भारत जगात दुसऱ्याच क्रमांकावर असून ही चिंतेची बाब आहे. याबाबत चिंता वाढवणारी आणखी एक बाब समोर आली आहे. कोरोना-लॉकडाऊनमुळे मधुमेह आजार असलेले रुग्ण मागील चार महिन्यापासून घरात आहेत. परिणामी त्यांच्या जीवनशैलीत बदल झाला असून ताण-तणाव, कोरोनाची भीती वाढली आहे. नियमितपणे वैद्यकीय तपासणी करता येत नाहीये. यामुळे मधुमेह रुग्णांच्या रक्तातील साखरेच्या प्रमाणात मोठी वाढ होत आहे. साखर वाढल्याची तक्रार असलेल्या रुग्णांमध्ये 7 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. साखर वाढल्यामुळे रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन कोरोनासह इतर गंभीर आजाराची भीती वाढली आहे. मधुमेह आजार असलेल्या रुग्णांनी नियमित तपासणी करुन घेत सर्व पथ्ये पाळावीत, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. ईटीव्ही भारतने याबाबत तज्ञांशी सवांद साधला आहे.
कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका ज्येष्ठ नागरिक आणि मधुमेहींना सर्वाधिक आहे. त्यातही मधुमेही रुग्णांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा समावेश अधिक आहे. अशावेळी कोरोनाचा धोका लक्षात घेता ज्येष्ठ नागरिक आणि मधुमेही रुग्णांना घरात राहणे गरजेचे झाले. दरम्यान, मधुमेही रुग्णांना नियमितपणे वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असते. कोरोना-लॉकडाऊन काळात रुग्ण भीतीने तपासणसीसाठी रुग्णालयात जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे साहजिकच रक्तातील साखरेची पातळी किती आहे याचे वेळेत निदान होत नसल्याने साखरेची पातळी खूप वाढल्यानंतर रूग्ण डॉक्टरांकडे येत आहेत. ही पातळी प्रमाणाच्या बाहेर वाढल्याने रुग्णांची प्रकृती गंभीर होत असल्याची अनेक उदाहरणे लॉकडाऊनच्या काळात समोर आल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास गंभीर आजारांचा धोका
अपोलो डायग्नोस्टिक्स वेस्ट इंडियाचे तंत्रज्ञ प्रमुख आणि झोनल पॅथॉलॉजिस्ट डॉ. संजय इंगळे यांनी सांगितले की, सध्या मधुमेही रुग्ण घरातच बसून आहेत. त्यात त्यांची नियमित तापणसी तर होत नाहीच. पण त्यांच्या खाण्या पिण्याच्या सवयी बदलल्या असून वेळा ही बदलल्या आहेत. लॉकडाऊनमुळे व्यायाम आणि चालणे-फिरणे नाही. या सगळ्या गोष्टींचा परिणामामुळे रुग्णांच्या रक्तातील साखरेच्या पातळीत मोठी वाढ झालेली दिसत असून अशा रुग्णांचा आकडाही वाढता आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास अनेक गंभीर आजार बळावू शकतात. जसे, हृदयविकार, मूत्रपिंडाची समस्या आणि डोळ्यांची दृष्टी कमी होणे इत्यादी. याशिवाय रक्तातील साखरेची पातळी वाढली तर नसांना आणि रक्तवाहिन्यांना इजा होऊ शकते, याचा विपरित परिणाम मेंदूच्या पेशींवर होतो. यामुळे अंधत्व, मूत्राशयातील समस्या आणि लैंगिक समस्या यांसारख्या इतर समस्यांना देखील कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे गरजेेचे आहे. तसेच मधुमेही रुग्णांमध्ये हायपोग्लेसिमीया (रक्तातील साखर (ग्लूकोज) पातळी सामान्यापेक्षा कमी असणे) सुद्धा असू शकतो. हे धोकादायक ठरू शकते, असेही डॉ. इंगळे यांनी सांगितले.
लॉकडाऊन दरम्यान लोकांनी मधुमेहावर नियंत्रण न ठेवल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढलेल्या रुग्णांमध्ये ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मधुमेह असलेल्या वृद्धांना कोरोना विषाणूची लागण होण्याचा धोका वाढू शकतो. याशिवाय चिंतेमुळेही मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, अशी माहिती पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉ. संजय नगरकर यांनी दिली आहे.
घरच्या घरी साखरेची पातळी तपासा
होम ग्लूकोज मॉनिटरिंगच्या सहाय्याने घरच्या घरी रक्तातील साखरेची पातळी तपासता येऊ शकते. यासाठी साखरेचे प्रमाण १४० आणि १८० मिलीग्राम/डीएलपेक्षा कमी असले पाहिजे. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी भरपूर पाणी प्या, फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करा. नियमित व्यायाम करा, यामुळे ताणतणाव कमी होतो. यासाठी योगा, प्राणायाम, श्वासोच्छवासाचा सराव करा. कोणतीही समस्या असल्यास फोनद्वारे संपर्क साधून डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीनुसार इन्सुलिन डोस सेट करा. डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेत आपले इन्सुलिन घ्या. नियमित तपासणी करुन निरोगी आयुष्य जगा, असेही डॉ. नगरकर यांनी सांगितले आहे.