मुंबई - गेल्यावर्षी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनंतर आतापर्यंत राज्यात तब्बल १२ लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. यातील ७ लाखांपेक्षा जास्त नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
मतदार नोंदणी ऑनलाईन तसेच तहसील कार्यालयात अर्ज करुन (ऑफलाईन) अशा दोन पद्धतीने करता येते. ऑनलाईन अर्जांच्या बाबतीत अनेक बाबींची पडताळणी केली जाते. त्यात ऑनलाईन अर्जासोबत आवश्यक पुरावे, छायाचित्र संगणकीय प्रणालीत अर्जदाराने भरणे आवश्यक असते. शिवाय या अर्जदारांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बूथ लेव्हल ऑफीसर- बीएलओ) प्रत्यक्ष पत्त्यावर जाऊन पडताळणी करतात, अशाप्रकारे ऑनलाईन अर्जांची छाननी करुन आवश्यक त्या बाबींची पूर्तता केलेल्या व्यक्तीचे नाव मतदार यादीत नोंदविले जाते.
आतापर्यंत १२ लाख ३१ हजार २७ जणांनी ऑनलाईन मतदार नोंदणी अर्ज केले असून त्यापैकी ७ लाख १७ हजार ४२७ मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. विविध बाबींच्या पडताळणीत पात्रतेविषयी पूर्तता करु न शकलेल्या २ लाख १८ हजार ९४८ अर्जदारांचे अर्ज अमान्य करण्यात आले. प्राप्त झालेल्या एकूण अर्जांपैकी अद्याप २ लाख ९४ हजार ६५२ अर्जदारांच्या अर्जावर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ऑनलाईनसोबतच ऑफलाईनदेखील नोंदणी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या (एईआरओ) कार्यालयात जाऊन केली जाते. अशा प्रकारे मतदार नोंदणी अर्ज करणाऱ्यांची संख्या ५५ लाख ७५ हजार आहे. त्यापैकी ४३ लाख ५१ हजार १३० अर्ज मान्य करण्यात आले. ३ लाख ४५ हजार ९०० अर्ज विविध बाबींची पूर्तता न केल्यामुळे नाकारण्यात आले आहेत. ८ लाख ३ हजार ४५ अर्जांवर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरु आहे.
मतदार यादीत नाव समाविष्ट होण्यासाठी अर्ज भरल्यानंतर संबंधित सहायक मतदार नोंदणी अधिकारी (एईआरओ) अर्जदाराच्या पत्त्यानुसार त्यास मतदान केंद्र यादी भाग क्रमांक दिला जातो. त्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये अर्जदाराच्या तपासणी करायच्या कागदपत्रांची यादी (चेकलिस्ट) तयार होते. ती संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे (बीएलओ) दिली जाते. त्यांच्याकडून अर्जदाराच्या पत्त्यावर जाऊन पडताळणी केल्यानंतर सहायक मतदार नोंदणी अधिकारी व शेवटी मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) यांनी अंतिम मान्यता दिल्यानंतर अर्जदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात येते.