मुंबई - गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला राज्यातील 700 शेतकऱ्यांना निमंत्रीत करण्यात आले आहे. यामुळे हा शपथविधी सोहळा ऐतिहासिक ठरणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दुष्काळग्रस्त भागात दौरा केला. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आता आपले सरकार येणार आहे. त्यामुळे सातबारा कोरा होईल असे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांनीही वेळोवेळी शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा व शिवसेनेची सत्ता यावी, अशी इच्छा बोलून दाखवली होती.
काही दिवसांपूर्वी उध्दव ठाकरे शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सांगलीला गेले होते. यावेळी रुपाली व संजय सावंत या शेतकरी दाम्पत्याने उध्दव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून उपवास करत पंढरपूरला अनवाणी गेले होते. तसेच शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेत असताना स्टेजजवळ उभं राहू द्या, अशी विनंती केली होती. त्यावेळी समोर नाही तर स्टेजवर जागा मिळेल असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार त्या शेतकरी दांपत्यालाही आमंत्रण देण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येकी 25 शेतकरी आणण्यासाठी संपर्कप्रमुख यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.