मुंबई - लहान मुलांमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण कमी आहे. तसे मुंबईतही एकूण रुग्णांच्या तुलनेत 10 वर्षाखालील मुलांना कोरोनाची लागण होण्याचा दर कमी आहे. पण, अनलॉकनंतर लहानग्यांमध्ये संसर्ग होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यातच 30 जूनपर्यंत मुंबईत 10 वर्षाखालील 1 हजार 311 रूग्ण आढळले असून यातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ही धक्कादायक बाब मानली जात असून लहान मुलांना घराबाहेर सोडू नका, त्यांची विशेष काळजी घ्या, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.
कोरोनाचा जगभर कहर सुरू असून लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे जगात, देशात 10 वर्षाखालील आणि 10 ते 20 वयोगटातील रूग्ण कमीच असून ही दिलासादायक बाब आहे. लहान मुलांचे लसीकरण झालेले असते, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. त्यामुळे लहान मुलांमध्ये संसर्ग कमी दिसतो. तर लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाणही खूपच कमी आहे.
महाराष्ट्रात तसेच मुंबईत 0 ते 10 आणि 10 ते 20 वयोगटातील रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त नव्हते. पण, आता मात्र मुंबई महानगर पालिकेच्या आकडेवारीनुसार 30 जूनपर्यंत 0 ते 10 वयोगटातील 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 10 ते 20 वयोगटातील 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 0 ते 10 वयोगटातील 1 हजार 311 मुले कोरोनाग्रस्त झाले आहेत. तर 10 ते 20 वयोगटातील 2 हजार 428 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. या माहितीला पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
30 जूनपर्यंत 7 बालकांचा मृत्यू झाला आहे. या बालकांना कोरोनाचा संसर्ग होता. पण, त्याचबरोबर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल किंवा त्यांना काही इतर आजार असावेत अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचवेळी लहान मुलांची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन ही त्यांनी केले आहे.
दरम्यान, जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. पल्लवी सपाळे यांनी ही अनलॉकमध्ये लहान मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढण्यास सुरुवात झाली आहे असे स्पष्ट केले आहे. तर सायनमधील एका डॉक्टराने लहान मुलाना घराबाहेर नेऊ नका, त्यांना प्रोटीनयुक्त आहार द्यावा आणि त्यांची योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्ला दिला आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केलेले बिकेसीतील कोविड रुग्णालयाचे पालिकेला हस्तांतरण नाहीच