मुंबई : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कामगार नेते विजय कांबळे यांचे मंगळवारी (२८ सप्टेंबर) निधन झाले. कामगारांचा कैवार घेणारे नेतृत्व हरपले, अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत कामगार नेते विजय कांबळे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
खेरवाडी येथे विजय कांबळे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन केंद्रीय मंत्री आठवले यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. कामगार नेते विजय कांबळे यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. येथेच त्यांनी २८ सप्टेंबरच्या रात्री अखेरचा श्वास घेतला. विजय कांबळे यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाल्यानंतर आठवले यांनी २४ सप्टेंबर रोजी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. कांबळे यांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर ते दिल्लीतील आपले सर्व कार्यक्रम रद्द करुन मुंबईत दाखल झाले.
राजकारणातही सक्रीय
विजय कांबळे हे अनेक वर्षे कामगार चळवळीत कार्यरत होते. त्यासोबतच ते नंतर राष्ट्रवादी काँग्रेससोबत जोडले गेले आणि २०१४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र कामगार चळवळ आणि आंबेडकरी चळवळीचा विचार त्यांनी कधीही सोडला नाही.
समुद्रात एक मूठ माती टाकण्याचे आंदोलन
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकसाठी कांबळे यांचे समुद्रात एक मूठ माती टाकण्याचे केलेले आंदोलन संस्मरणीय ठरले. कामगार क्षेत्रातील कांबळे यांचे योगदान महत्त्वाचे होते.
कामगारांचा कैवार घेणारे नेते
कामगारांचा खरा कैवारी अशी त्यांची प्रतिमा होती. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळ आणि राज्याच्या कामगार क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याचे रामदास आठवले म्हणाले.
हेही वाचा - आरेत बिबट्याची दहशत : धाडसी महिलेने बिबट्याचा हल्ला लावला परतवून; महिला जखमी