मुंबई- ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे मुंबईत हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते 69 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मराठी राजकीय व्यंगचित्रकारांच्या यादीत विकास सबनीस यांचे नाव प्रामुख्याने घेतले जात होते. त्यांच्या व्यंगचित्रावर आर.के. लक्ष्मण आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रकलेचा प्रभाव होता. अनेक विषयांवर त्यांनी काढलेली व्यंगचित्र मोठ्या लेखाचा परिणाम घडवत असत. आपल्या व्यंगचित्रकलेची सुरुवात त्यांनी मुंबई सकाळ, संडे ऑब्झरव्हर, मार्मिक आणि सामना या वृत्तपत्रांमधून केली. कोणत्याही विषयावर सहज व्यंगचित्र काढण्यात त्यांचा हातखंडा होता.
विशेष म्हणजे, संपूर्णपणे व्यंगचित्रकलेवर अवलंबून असलेले असे ते चित्रकार होते. याचवर्षी त्यांच्या व्यगचित्रकलेला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याहस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला होता. गेले काही दिवस ते आजारी होते. मात्र, आज रुटीन चेकअपसाठी त्याना दादरमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने एक सिद्धहस्त व्यंगचित्रकार आपल्यातून गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
हेही वाचा- सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? फडणवीसांचा सेनेवर हल्लाबोल