मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझर्सच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. याच संधीचा फायदा घेत बनावट मास्क आणि सॅनिटायझर्स बाजारात विक्रीसाठी आणले जात आहेत. या बनावट सॅनिटासझर्सची विक्री करणाऱ्यांविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईला वेग दिला आहे. त्यानुसार आठवड्याभरात राज्यभरातून 56 लाख 66 हजारांचा बनावट सॅनिटायझर्सचा साठा जप्त केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त व्ही. के. बियाणी यांनी दिली.
कोरोना व्हायरसपासून रक्षणासाठी मास्क तसेच सॅनिटायझर्सचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांकडून मास्कची तसेच सॅनिटायझर्सची मागणी वाढली आहे. मागणी प्रचंड वाढली असतानाच त्या तुलनेत बाजारात त्याचा पुरवठा मात्र कमी आहे. त्यामुळे अनेक मेडिकलमध्ये ते उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. याचाच फायदा घेत काही कंपन्या तसेच टोळ्या बनावट मास्क, सॅनिटायझर्स तयार करत त्याची विक्री करत आहेत.
विनापरवाना ही विक्री होत आहे. अस्वच्छ ठिकाणी सॅनिटायझर्स तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे असा गोरख धंदा करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी एफडीएने राज्यभर धडक मोहीम सुरु केली आहे. त्याअंतर्गत 11 ते 15 मार्चपर्यंत 7 ठिकाणी छापा टाकत 56 लाख 66 हजारांचा बनावट सॅनिटायझर्सचा साठा जप्त करत तो नष्ट केला आहे. तर आणखी 3 लाख 93 लाखांचा साठा प्रतिबंधित केला असून हा साठा लवकरच ताब्यात घेत तोही नष्ट करण्यात येणार असल्याचे बियाणी यांनी सांगितले.
औरंगाबाद, मुंबई, कोकण, नाशिक, नागपूर आणि पुणे या ठिकाणीही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईअंतर्गत सर्वाधिक बनावट सॅनिटायझर्सचा साठा औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसीतील युरोलाईफ हेल्थकेअर कंपनीतून 50 लाखांचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई यापुढेही अशीच सुरु राहणार आहे. सॅनिटायझर्स खरेदी करताना योग्य ती काळजी घ्या, औषध विक्रेत्यांकडूनच ते खरेदी करा, खरेदी बिल मागा, असे आवाहनही बियाणी यांनी ग्राहकांना केले आहे. अन्न व औषधासंदर्भात काही तक्रारी असतील तर एफडीएशी संपर्क साधण्याचेही आवाहन केले आहे.
हेही वाचा - कोरोना प्रभाव: मुंबईतील रस्त्यावर मेडिकली प्रमाणित नसलेल्या मास्कची होत आहे विक्री