मुंबई - राज्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रात आढळून आले आहेत. नागरिकांमध्ये हर्ड ह्युमिनिटी, अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत का, याची माहिती मिळावी म्हणून पालिकेने बाधित विभागांमध्ये सेरो सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा चेंबूर, वडाळा, सायन, माटुंगा व दहिसर या भागांत पूर्ण करण्यात आला आहे. १३ ते २८ ऑगस्ट दरम्यान केलेल्या सर्वेक्षणात ५,८४० जणांची तपासणी करण्यात आली. पुढील आठवड्यात या सर्वेक्षणाचा अहवाल येईल, असे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबईत मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून यायला सुरुवात झाली होती. काही विभाग तर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होते. यामुळे अशा विभागात नागरिकांमध्ये हर्ड ह्युमिनिटी अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत का याची माहिती मिळवण्यासाठी सेरो सर्व्हे करण्यात आला होता. यात झोपडपट्टी विभागातील नागरिकांमध्ये ५७ टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे १६ टक्के याप्रमाणे अँटीबॉडीज तयार झाल्याचे समोर आले होते. मुंबईतील नागरिकांना कोरोना होऊन गेला तरी, त्यांना त्याची माहिती नसल्याचेही या सर्वेक्षणात समोर आले आहे.
हेही वाचा-महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्याला 'वाय' सुरक्षा देणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान- गृहमंत्री देशमुख
पालिकेने ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. अशा ठिकाणी दुसऱ्यांदा सेरो सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे चेंबूर, वडाळा, सायन, माटुंगा व दहिसर या भागांत १३ ते २८ ऑगस्ट दरम्यान सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात ५,८४० जणांची तपासणी करण्यात आली असून पुढील आठवड्यात या सर्वेक्षणाचा अहवाल येईल, असे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. सेरो सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा पूर्ण झाला असून अंतिम अहवाल तयार करण्याचे काम सुरु आहे. लवकरच हाअहवाल सार्वजनिक करण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
पहिला सेरो सर्व्हे अहवाल काय म्हणतो -
मुंबई महानगरपालिकेने केलेल्या पहिल्या टप्प्यातील सेरो सर्वेक्षणात झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी परिसर मिळून आर उत्तर, एम पश्चिम आणि एफ उत्तर या ३ विभागांमध्ये हे नमुने संकलित करण्यात आले होते. जुलै महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात अंदाजित केलेल्या ८ हजार ८७० पैकी एकूण ६ हजार ९३६ नमुने संकलित करण्यात आले होते. त्यात झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे ५७ टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे १६ टक्के याप्रमाणे अँटीबॉडीज तयार झाल्याचे समोर आले होते.