मुंबई - कोरोना आणि त्यांनतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेक प्रकारच्या अडचणी असल्या तरी राज्यात जून महिन्यात शाळा आणि त्यांचे शिक्षण सुरू होणार आहे. मात्र या शाळा प्रत्यक्षात न भरता ऑनलाईन अथवा डिजिटलच्या माध्यमातून सुरू केल्या जाणार आहेत. तर दुसरीकडे ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रभाव नाही अशा आदिवासी, दुर्गम भागातील शाळा मात्र नियमित सुरू केल्या जाणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तब्बल तीन तास आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासोबत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यासाठीचा एक आढावा घेतला. त्यात मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शाळांचे शिक्षण हे नियमित वेळेत सुरू करा, मात्र ते ऑनलाईन आणि परिस्थिती पाहून ऑफलाईन पद्धतीने करावे, असे निर्देश दिले आहेत.
आज झालेल्या या बैठकीत प्रामुख्याने राज्यातील मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ देणार नाही, ज्या शाळा क्वारंटाईन करण्यासाठी ताब्यात घेतल्या होत्या त्या शासन खर्चाने निर्जंतुकीकरण करून देण्यात येतील, असा निर्णय घेण्यात आला. तर दुर्गम भागांत जिथे कनेक्टिविटी नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, अशा ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून शाळा सुरू कराव्यात असे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी फिजीकल शाळा सुरू करणे अडचणीचे आहे त्या ठिकाणी इतर पर्याय तसेच ऑनलाइन शिक्षण सुरू करावे.
जूनमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपले शालेय वर्ष सुरू झालेच पाहिजे. आरोग्याची काळजी घेऊन जिथे शाळा सुरू करता येणे शक्य आहे, तिथे त्या सुरू करणे. तसेच जिथे ऑनलाईन शक्य आहे तिथे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले पाहिजे, असे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या या बैठकीत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेले अभिप्राय सादर केले. तर राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. आमदार कपिल पाटील विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांच्या संदर्भात विषय मांडला. यावेळी अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्यासमवेत डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ अनिल पाटील, अनिरुद्ध जाधव तसेच इतर शिक्षण तज्ञही उपस्थित होते.
ऑनलाईन शाळा सुरू करताना गुगल प्लॅटफॉर्मचा प्रायोगिक स्तरावर वापर करावा. मात्र स्वतंत्रपणे संगणकीय पद्धती विकसित करून ऑनलाईन शिक्षणाची मजबूत यंत्रणा दीर्घ काळासाठी विकसित करावी असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.