मुंबई - राज्यात कोरोना आणि त्याच्या प्रादुर्भावाने धुमाकूळ घातला आहे. अशा परिस्थितीत सोमवारपासून ऑनलाइन शाळा सुरू केल्या जाणार आहेत. मात्र त्याला कडाडून विरोध सुरू होत असतानाच आज शालेय शिक्षण विभागाने शाळा जुलै महिन्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला असून यासाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या नवीन निर्णयानुसार नववी, दहावी आणि बारावीची प्रत्यक्षात शाळा आणि त्यांचे वर्ग जुलै महिन्यापासून सुरू केली जाणार आहेत. तर या वेळापत्रकानुसार पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळांची सुरुवात सप्टेंबर महिन्यापासून होणार आहे. सहावी ते आठवीचे वर्ग हे ऑगस्टपासून भरवले जाणार आहेत. दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या प्रत्यक्ष वर्गाचा निर्णय घेतला जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयात पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा वापर करू नये, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे
शालेय शिक्षण विभागाने आज जाहीर केलेले हे वेळापत्रक संभाव्य स्वरूपाचे असून स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्यात यावे, तसेच आवश्यकतेनुसार नवीन प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने किंवा शाळेत गर्दी होणार नाही याची खबरदारी घेऊन करण्यात यावी, असेही या आदेशात म्हटले आहे.
दुसरीकडे डिजिटल शिक्षणासंदर्भात विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचा विचार करून घरी राहून डिजिटल पद्धतीने अभ्यास हा वेळेच्या मर्यादितच केला जावा, असे त्या आदेशात नमूद केले आहे. त्यामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी व इयत्ता पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा वापर करू नये, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तर इयत्ता तीसरी ते पाचवीसाठी कमाल एक तास प्रतिदिन, इयत्ता सहावी ते आठवीसाठी कमाल दोन तास प्रतिदिन, इयत्ता नववी ते बारावीसाठी कमाल तीन तास प्रतिदिन असे नियोजन करण्यात येण्याची यावेत, असेही या आदेशात म्हटले आहे. तसेच डिजिटल अध्ययनात आवश्यकतेनुसार मोकळा वेळ म्हणजेच ब्रेक देण्यात यावा आणि विद्यार्थ्यांचे सलग अध्ययन करून घेण्यात येऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.