मुंबई Scams With Job Lures: दिल्ली, भिवंडी आणि बिहार येथून या आरोपींना अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त राजटिलक रौशन यांनी दिली आहे. अटक आरोपींची नावे रामकृपाल रामसेवक कुशावह (वय 45), रोहित महेश्वरप्रसाद सिन्हा (वय 33), आशिष कुमार मुंगेश्वर मोहता (वय 30), अमितोष श्रवणकुमार गुप्ता (वय 40) आणि राहुलकुमार शिवान चौधरी (वय 22) अशी आहेत. (jobless youth scams)
खोट्या जाहिराती देऊन गरजूंची फसवणूक: आरोपी टोळी मुंबईसह व्हाट्सऍप, टेलिग्राम यासारख्या सोशल मीडियाचा वापर करत आखाती देशात चांगल्या पगाराच्या नोकरीच्या खोट्या जाहिराती देऊन गरजू तरुणांना त्यांच्या जाळ्यात अडकवत असे. तरुणांना खोटा विजा तसेच बनावट नियुक्ती पत्रे देऊन त्यांच्याकडून हजारो रुपये उकळले जात. जोवर तरुणांना त्यांची फसवणूक झाल्याचं समजत असे तोवर ही टोळी गाशा गुंडाळून पसार झालेली असे. महाराष्ट्रासह, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश आणि इतरही राज्यातील शेकडो तरुणांना या टोळीने गंडा घातल्याचं समोर आलं आहे.
दोन आरोपी दिल्लीतील कारागृहात: या टोळीचा मास्टरमाइंड असलेला राहुल कुमार शिवान चौधरी हा आरोपी बिहारमधील गया जिल्ह्यातील आहे. अटक केलेला पाच आरोपींना व्यतिरिक्त दोन आरोपी हे सध्या दिल्लीतील कारागृहात असून त्यांच्या विरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेने आणि स्थानिक पोलिसांनी नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्या प्रकरणी कारवाई करून अटक केली आहे. दिल्लीच्या जेलमध्ये असलेल्या आरोपींची नावे इलियाज आणि फैजान अशी असून त्यांची कस्टडी घेण्यासाठी मुंबई पोलीस लवकरच दिल्लीला जाणार आहेत.
कन्सल्टन्सी कार्यालय थाटून फसवणूक: आरोपी टोळीने बॅलर्ड पियर येथे बॉम्बे इंटरनॅशनल कन्सल्टन्सी नावाने ऑफिस थाटून अनेकांची फसवणूक केली. या ऑफिसवर अनेकांनी विचारपूस आणि तक्रार घेऊन आल्यानंतर बॉम्बे इंटरनॅशनल कन्सल्टन्सी हे कार्यालय बंद करून अंधेरीतील एअरपोर्ट परिसरात इंडियन ओव्हरसीज प्लेसमेंट सर्विसेस या नावाने दुसरी कंपनी या टोळक्याने सुरू केली. तरुणांना अझरबैजन, ओमान, दुबई, सौदी अरेबिया, कतार आणि रशिया या देशातील वेगवेगळ्या नामांकित कंपनीत नोकरी देण्याचे आमिष देऊन तरुणांकडून त्यांचे पासपोर्ट मुंबईतील वेगवेगळ्या कार्यालयात जमा करून घेतले. त्यानंतर तरुणांना वेगवेगळ्या देशातील नामांकित कंपन्यांचे बनावट ऑफर लेटर आणि संबंधित देशांचा पण वर्कविजा व्हाट्सएपद्वारे पाठवून तरुणांकडून 40 ते 60 हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवरती या टोळक्याने स्वीकारले.
दागिने विकून पैशाची जमवाजमव: भरत कोळी हा पीडित तक्रारदार असून कोळी एअरपोर्ट वरती पासपोर्ट आणि व्हिजा घेऊन गेल्यानंतर तो खोटा असल्याचे कळाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कोळी यांनी मुंबई पोलिसांना याबाबत माहिती दिली. माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष पाच कडे वर्ग करण्यात आला. तक्रारदार भरत कोळी हे ट्रॉम्बे येथे राहणारे असून घरातील दागिने विकून परदेशात नोकरी मिळवण्यासाठी साठ हजार रुपये दिले असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. त्याचप्रमाणे डोंबिवलीतील सत्यवान थोटे 35 वर्षीय व्यक्तीने या बोगस कंपनीला चाळीस हजार रुपये दिले होते. मात्र नोकरी तर लागली नाही. पण या पीडित व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
कार्यालयावर पोलिसांची छापेमारी: दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच भिवंडीत अशा प्रकारचे बोगस नोकरी देणाऱ्या कंपनी वरती छापा टाकून आरोपींना अटक केली होती. त्यानंतर आरोपींनी भिवंडीतून कार्यालय बंद करून मुंबईत आपले बस्तान मांडले होते. मुंबई पोलिसांनी अंधेरीतील कार्यालयात छापा टाकून 63 पासपोर्ट, अझरबैजन देशाचे एकूण सात बनावट व्हिजा, इलेक्ट्रॉनिक साहित्य, विविध कंपन्यांचे 14 मोबाईल सिम कार्ड, डेबिट कार्ड, सहा चेकबुक व पासबुक ऑफर लेटर असे गुन्ह्यात वापरण्यात आलेले साहित्य जप्त केले आहे.
हेही वाचा: