मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विरोधीपक्षाने दिलेला गौरव प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी नियमावर बोट ठेवत फेटाळून लावला. शिवाय सावरकरांबाबत कोणालाही आक्षेप असण्याचा प्रश्न नाही असंही ते म्हणाले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावरकरांना भारतरत्न मिळावा, यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू, पण तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान मोदी असताना सावरकरांना भारतरत्न का दिला नाही, याची विचारणा करत विरोधकांच्या प्रस्तावाची हवाच त्यांनी काढली. यावेळी काही काळ सभागृहात गोंधळ झाला.
सावरकरांचा गौरव प्रस्ताव सरकारने मांडावा, अशी सूचना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी नियमावर बोट ठेवताना गौरव प्रस्तावाचे काही नियम आणि निकष असतात हे मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांनी यात आणखी भर टाकत मुनगंटीवार यांनी दिलेला प्रस्तावात शब्दप्रयोग, वक्रोक्ती असल्याने तो तसा मांडता येत नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेत करत यात कोणतेही शब्द प्रयोग नाही वक्रोती नाही हे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. उलट काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या शिदोरीत सावरकरांबद्दल अपशब्द वापरले गेल्याचा मुद्दा उपस्थित केला. या मुखपत्रावर बंदी घालण्याची जोरदार मागणी केली. तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजप सरकारच्या काळात सावरकरांना भारतरत्न का दिला नाही तो पहिले द्यावा, तो दिल्यानंतर आम्ही तुमच्या अभिनंदनाचा प्रस्ताव या सभागृहात मांडू असे प्रति आव्हान विरोधी पक्षाला दिले.
मात्र, त्याचवेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी फडणवीसांनाच कोंडीत पकडले. या पुस्तकातील आक्षेपार्ह मजकूर फडणवीस वाचून सावरकरांचा अवमानच करत आहेत, त्याचे भान विरोधी पक्षनेत्यांनी ठेवावे असे ठणकावून सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या चर्चेत हस्तक्षेप करत भाजपचा डाव भाजपवर उलटवण्याचा प्रयत्न केला. फडणवीस मुख्यमंत्री असताना एकदा नाही तर दोन वेळा भारतरत्न मिळावा असा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. त्याचे काय झाले, तेव्हा त्यांना का भारतरत्न देण्यात आला नाही अशी विचारणा केली. त्यामुळे केवळ राजकारणासाठी सावरकरांचा वापर करू नये, असे त्यांनी सांगितले. शिवाय सावरकरांचे विचार सर्वांनाच पटतील असे नाही. गाई आणि बैलाबाबतचे शास्त्रीयदृष्ट्या त्यांचे विचार भाजपला मान्य आहेत का, अशी विचारणा ही त्यांनी केली. शिवाय सावरकरांबाबत सर्वांनाच आदर असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पुढच्या काळात सर्वांनी मिळून सावरकरांना भारतरत्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी नियमावर बोट ठेवत हा गौरव प्रस्ताव फेटाळून लावला.