मुंबई: दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत आज गृह खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक मंत्रालयात झाली. या बैठकीपूर्वी वळसे - पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट (Chief Minister's meet) घेतली. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले होते. गृहमंत्री वळसे - पाटील यांनी स्पष्टिकरण देताना स्पष्ट केले की, आजची भेट पूर्वनियोजित होती. महाराष्ट्र पोलिसांचा ११२ प्रकल्पांचा शुभारंभ उद्यापासून सुरू होत आहे, त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांना भेटलो. गृहखात्यावर मुख्यमंत्री बिलकुल नाराज नाहीत. त्यांनी स्वतः त्याबद्दल खुलासा केला आहे. राज्य सरकार परस्परांना विश्वासात घेऊन काम केलं जातं आहे. संजय राऊत यांची भावना बरोबरआहे. आमच्या विभागातून काही कमतरता असेल तर त्यामध्ये सुधारणा केली जाईल, असे वळसे- पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या बाबतीत सॉफ्टकॉर्नर घेते का? असा सवाल गृहमंत्र्यांना विचारला असता, सॉफ्ट आणि हार्ड भूमिका काय असते हे मला कळत नाही. मी समोर येतील त्या कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेतो. कोणती कारवाई करायची झाल्यास ती न्यायालयात टिकली पाहिजे. त्यामुळे सॉफ्ट असायच कारणच नाही. जिथे चूक असेल, तिथे कारवाई होणारच असे मंत्री वळसे- पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच पोलीस खाते आणि गृहखात्याला कायदे आणि नियमांच्या आधारे कारभार करावा लागतो.
प्रत्येक प्रकरणात गृहमंत्री थेट आदेश देत नाहीत. बहुतांश निर्णय हे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून त्यांच्या स्तरावर होतात. हे निर्णय घेताना विलंब होत असेल तर त्याची माहिती घेऊन त्याला गती देण्याची जबाबदारी गृहमंत्र्यांकडे असते. ते काम आम्ही योग्य प्रकारे करत असल्याचे वळसे - पाटील म्हणाले. भाजपकडून शरद पवार यांच्यावर टीका केली जातेय. मस्जिद वरील भोंगे काढण्याची मागणी सुरू आहे. मंत्री वळसे-पाटील यांनी यावर भाष्य केले ते म्हणाले की, महागाई, बेरोजगारी सारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत. त्यासाठी धार्मिक विषयांवर चर्चा करण्यात येत असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.
हेही वाचा : Sanjay Raut's warning to BJP : राजकीय गुन्हेगारांच्या कॉलरला कायदेशीर मार्गाने हात घालणार - राऊत