मुंबई - राज्यातील सर्वधर्मीयांची मंदिरे, प्रार्थनास्थळे भाविकांसाठी पुन्हा खुली करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. दिवाळीच्या पाडव्यापासून 16 नोव्हेंबरला (सोमवार) मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत अनेक ठिकाणी आनंददायी प्रतिक्रिया उमटत आहेत. सरकारच्या मंदिर उघडण्याच्या निर्णयावर शिवसेना प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी कोरोनाबाबतची पूर्ण खबरदारी भाविकांनी प्रार्थनास्थळांवर घ्यावी, असे आवाहन केले आहे. तसेच देवांचे आशीर्वाद महाराष्ट्रावर आहेत. काही अंशी ते संकट आपण परतवून लावले आहे. पण अजूनही आपण सावध राहिलं पाहिजे, असेही ते म्हणाले.
देवाचे दर्शन घेताना काळजी घ्यायला हवी. मंदिर उघडण्याबाबत कुणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. पंतप्रधान मोदी यांच्या आदेशानेच मंदिरे बंद होती. महाराष्ट्र स्वाभिमानी राज्य आहे. ईर्षा आणि अहंकार महाराष्ट्राला चालत नाही, हे लोकांनी ही दाखवून दिले आहे, असे ते म्हणाले.
माझ्या आयुष्यात कोणताही बदल नाही, वाढदिवस असला तरी माझे काम मी करतोय. माझे आयुष्य सामनात गेले आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाची 'सामना'ची ताकद निर्माण केलीय. त्यातच मी काम करत राहणार आहे, असे ते म्हणाले.
संजय राऊत यांनी यावेळी जम्मू काश्मीरमधील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. मेहबुबा मुफ्ती यांनी अन्य मार्गाने कलम 370 हटवण्याचा प्रयत्न चालवला आहे. पण ते योग्य नाही, असेही ते म्हणाले.
संजय राऊत यांचा आज वाढदिवस -
कोरोना परिस्थिती लक्षात घेता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वाढदिवस साजरा करणार नसल्याचे सांगितले. दरवर्षी 15 नोव्हेंबरला राऊत यांचा वाढदिवस मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. मात्र, यावेळी ते आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत असं त्यांनी सांगितलं आहे. राज्यातील शिवसेना कार्यकर्त्यांना त्यांनी फेसबुकद्वारे ही माहिती दिली आहे. कोरोना परिस्थिती लक्षात घेता वाढदिवसाचा आनंदोत्सव साजरा करणे उचित होणार ठरणार नाही, असे ते म्हणाले.
मंदिरे उघडल्यानंतर शिस्त पाळण्याचे आवाहन -
'अनलॉक'ची प्रक्रिया सुरू करण्यात आल्यानंतरही राज्यातील मंदिरे मात्र उघडण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. अनलॉकमध्ये बहुतेक सर्वच बाबी सुरू झाल्याने राज्यातील मंदिरेही खुली करावीत, अशी मागणी भाजपसह काही संस्था, संघटना सातत्याने करत होत्या. याची दखल घेत अखेर ठाकरे सरकारने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय घेतला. मंदिरे उघडल्यानंतर शिस्त पाळण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा - बिहारमध्ये एनडीए विधिमंडळ पक्षाची बैठक; फडणवीसही राहणार उपस्थित