मुंबई - पार्थ पवार यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे विधान केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व पार्थ यांचे आजोब शरद पवार यांनी आपले मत व्यक्त केले. हा सर्व त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. यावर मी मत व्यक्त करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.
पार्थ पवार हे लोकसभेचे उमेदवार होते व पवार कुटुंबातील घटक आहेत. त्यांच्याबाबत शरद पवारांनी एखादी भूमिका घेतली असेल किंवा एखादे वक्तव्य केले असेल, तर त्यावर फार चिंता करण्याचे कारण नाही. पवारांचे कोणतेही विधान निरर्थक नसते. यामध्ये मीडियाने न पडलेले बरे, असेही संजय राऊत म्हणाले.
शरद पवार कायद्याच्या चौकटीत असलेल्या गोष्टींना विरोध करत नाहीत. अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा मुंबई पोलीस योग्य प्रकारे तपास करत आहेत. मुंबई पोलिसांच्या क्षमतेवर दोनशे टक्के विश्वास आहे, असे पवार म्हणाले आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील तेच सांगितले आहे. आम्ही सगळेही तेच सांगत आहोत. मुंबई पोलिसांचा तपास सुरू असताना सीबीआयची मागणी करणे चुकीचे आहे. हे महाराष्ट्राच्या अधिकारांवर आक्रमण आहे. मुंबई पोलिसांनी जो तपास केला, त्या तपासाच्यापलीकडे सीबीआयसाठी काही शिल्लक असेल, असे आम्हाला वाटत नाही त्यामुळे आम्ही सीबीआयला मध्ये आणले नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.
सुशांतच्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव अद्याप तपास यंत्रणांनी घेतलेले नाही. एखाद्या मोठ्या कुटुंबाचे नाव घेतल्याशिवाय एखाद्या प्रकरणाला सनसनाटी मिळत नाही, हल्ली हे सूत्र झाले आहे. त्यामुळे माध्यमे आदित्य ठाकरेंचे नाव घेत आहे. मुंबई पोलीस तपास करत आहेत, त्यांना शांतपणे तपास करून द्यावा. तपास करू देणे हे सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी गरजेचे आहे. त्याच्या कुटुंबीयांनीही शांत राहावे आणि मुंबई पोलिसांच्या तपासात सहकार्य करावे. गुन्हेगार शोधण्याचा हाच एक मार्ग आहे असल्याची प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.