मुंबई - शरद पवार साहेबांचं वय मोजू नये. सगळे तरुण त्याच्यापूढे फिके पडतील. अशाप्रकारचं काम ते आजही करत आहेत. त्यांच्याकडून आम्ही रोज प्रेरणा घेतो, पाच पिढ्या प्रेरणा घेत आहेत, त्यांच्या वयाचा हिशोब करणं हा त्यांच्यावर अन्याय आहे. ते सर्वसामान्यांना आधार आहेत, ते शतकपूर्ती करतील, असे गौरद्वागार व्यक्त शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ऐंशीवा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने सर्व स्तरातून पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. गेल्या पाच पिढ्यांना शरद पवार प्रेरणा देत आहेत. त्यामुळे त्यांच्या वयाचा कोणी हिशोब करू नये. ते त्यांच्यावर अन्याय करणारं ठरेल. सगळे तरुण फिके पडतील अशा प्रकारचं काम ते आजही करत असतात. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. भविष्यात त्यांना राष्ट्रीय स्थरावर मोठी संधी प्राप्त व्हावी, अशी मी प्रार्थना करतो. बाळासाहेब आणि पवार यांचं बोट धरून आम्ही पुढे आलो आहोत. अनेक तरुण पुढे आलेत, ते सतत पाठीशी उभे राहतात, ते अनेकांना आधार आहेत, असे राऊत यांनी सांगितले.
'सामना'तून पवार यांचे कौतूक आणि शुभेच्छा
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून देखील पवार यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला आहे. शिवसेनेने शरद पवार यांच्या कामांचा आणि स्वभावाचा उल्लेख करत स्तुतीसुमने उधळली आहेत. 80 वर्षांचे होऊनही शरद पवार यांचे वय वाढलेच नाही असा त्यांचा उत्साह आजही दिसत आहे. खऱ्या अर्थाने लोकप्रिय, संघटना कुशल, राज्याचे व देशाचे प्रश्न उत्तम तऱ्हेने जपणाऱ्या, मोदींपासून क्लिंटनपर्यंत संबंध ठेवणाऱ्या, सुस्वभावी, स्नेह आणि शब्द जपणाऱ्या, हत्तीची चाल आणि वजिराचा रुबाब असलेल्या शरद पवार यांचे पुढील आयुष्य हे गंगा-यमुनेची विशालता आणि हिमालयाची उत्तुंगता गाठणारे होवो, अशा शुभेच्छा शिवसेनेने दिल्या आहेत. 'ठाकरे सरकार' ही शरद पवारांची अलीकडच्या काळातील सगळ्यात मोठी बेरीज असल्याचेही शिवसेनेने म्हटले आहे.
हेही वाचा - आजपासून शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मिळणार मोफत रक्त
हेही वाचा - मुख्यमंत्री ठाकरे आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर; असा आहे दौरा