मुंबई - परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. विशेष म्हणजे याआधीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून परब यांना ईडीची नोटीस मिळाल्याची माहिती दिली होती. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधातील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
राज्यातील वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे -
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक नाट्यानंतर शिवसेनेचे नेते आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत ते नारायण राणे यांच्या अटकेसंदर्भात बोलताना दिसत होते. यावरून भाजपा आक्रमक झाली असून आता अनिल परब यांना ईडीची नोटीस आली आहे. या संदर्भात संजय राऊत यांनीही ट्विट केले होते. त्यामुळे आता राज्यातील वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहे.
काय म्हणाले संजय राऊत -
या संदर्भात ट्विट करताना संजय राऊत यांनी केंद्रातील भाजपा सरकार अनेक आरोप लावले. 'शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू, जय महाराष्ट्र! असे ट्वीट संजय राऊत यांनी केले.
हेही वाचा - 100 कोटी खंडणी प्रकरणात आता अनिल देशमुखांना दोषी धरणे योग्य नाही - जयंत पाटील