मुंबई : अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या फोटोचा वापर केला जात आहे. माझा फोटो लावू नका. अन्यथा मी कोर्टात जाईन, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे. तरीही अजित पवार गटाचे नेते शरद पवारांचा फोटो सर्रास वापरत आहेत. यावरुन येत्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात वाद होण्याची शक्यता आहे. हा वाद होण्यापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी अजित पवार गटाला फटकारले आहे.
केंद्रातील एजन्सीचा गैरवापर : शरद पवार हयात असताना त्यांचा पक्ष फोडतात. तसेच त्यांनी त्यांचा फोटो लावण्यास विरोध केल्यानंतरही तुम्ही त्यांचा फोटो वापरतात. त्यांना आमचे गुरुदैवत म्हणतात आणि त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसता. त्यापेक्षा स्वतःचा पक्ष स्थापन करा आणि मतं मागा. तुम्हाला शरद पवार आणि बाळासाहेब हे कशाला हवेत, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. डरपोक लोकांनी बाळासाहेबांची शिवसेना फोडली,असा टोलाही राऊतांनी शिंदे गटाला लगावला.
शरद पवारांना आहे भीती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी फोटो वापरण्यास मज्जाव केला आहे. परंतु अजित पवार गट त्यांचा फोटो सर्रासपणे वापरत आहे. त्यावरुन संजय राऊतांनी अजित पवारांवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेचा संदर्भ दिला. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे देशवशियांच्या भावना आहेत. जे शिवसेनेच्या बाबतीत घडले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत घडेल, अशा प्रकारची चिंता शरद पवारांनी व्यक्त केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष स्थापना केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हयात असताना त्यांचा पक्ष तोडण्यात आला. त्यानंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह फुटीर गटाला देण्यात आले. तसाच राष्ट्रवादी पक्ष तोडण्यात आला. मात्र शरद पवार हयात आहेत. त्यांची कार्यकारणी असूनही त्यांना भीती वाटते की, शिवसेनेच्या मॉडेलनुसार घडेल. आपला पक्ष फुटीर गटाला म्हणजे अजित पवार गटाला दिला जाईल. पक्षाचा संस्थापक अध्यक्ष हयात असताना त्याचा पक्ष फोडून फुटीर गटाला बहाल केला जातो. हे राजकारणातील विदारक चित्र आहे.
हेही वाचा-