मुंबई - राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव व झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे राज्याशी संबंधित विविध प्रश्नांवरून राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये तीव्र मतभेद दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत आज शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनमध्ये भेट घेतली.
खा. राऊत यांची ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, सध्या राज्य सरकार आणि राज्यपालांमध्ये काही मुद्यांवरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राऊत यांनी, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे संबंध अत्यंत मधुर आहेत. दोघांना एकमेकांविषयी आदर आणि प्रेम आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे संबंध अगदी पिता- पुत्राचे असावेत तसेच आहेत, असे सांगितले. तसेच राज्यपाल हे आमचे मार्गदर्शक आहेत. खूप दिवस त्यांना भेटलो नव्हतो म्हणून ही सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
विद्यापीठाच्या अंतिम परीक्षा घेण्याबाबत शालेय उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत राज्यपालांनी आक्षेप घेतला. त्यावर राऊत म्हणाले की, 'सामंत यांचे निवेदन मी वाचले, त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. निर्णय घेतलेला नाही आणि राज्यपाल हे कुलपती आहेत. शेवटी ते जे सांगतील त्याबाबत सरकारमध्ये चर्चा होईल आणि ते निर्णय घेतील.'
दरम्यान, संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात टीका केली होती. त्यांनी ट्विट करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला होता. राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही? पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझनेवालों को इशारा काफी है!, अशी टीका राऊत यांनी केली होती.
हेही वाचा - लॉकडाऊनच्या काळात मुंबईत जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर