मुंबई- बॉलिवूडमध्ये खलनायकाची भूमिका करणाऱ्या सोनू सूद याने गेल्या काही दिवसांत हजारो मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठवले. त्याने मजुरांसाठी रेल्वे, बसेस आणि विमानाची सोय केली. सोनू सूद याच्या कामाचे सोशल मीडियावर कौतुकही झाले. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी सोनू सूदला शाब्बासकी दिली. मात्र, सोनू सूदच्या कामावर सामनाचे संपादक संजय राऊत यांनी रोखठोक या सदरातून एकटा सोनू सूद खरा! या लेखाद्वारे प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
लॉकडाऊन काळात इतर राज्यांत अडकलेल्या कामगारांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी गेल्या काही दिवसात अनेक जण पुढे आले होते. केंद्र सरकारने मजुरांसाठी विशेष श्रमिक एक्सप्रेस रेल्वे गाड्यांची सोय केली. याचसोबत राज्य सरकारही या कामगारांसाठी विशेष बस गाड्या चालवत होते. मात्र, गेल्या काही दिवसांत सोनूने कधी स्वतः पैसे खर्च करत तर कधी चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमातून या कामगारांना बस, रेल्वे, विमानाने घरी पाठवले. आतापर्यंत सोनूने कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, ओडीशा, देहारादून अशा विविध भागातील कामगारांना मदत केली. मात्र, सोनू सूदला पुढे करत ठाकरे सरकार अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय. सोनू सूद हा महाबली, बाहुबली, सुपरहिरो आहे, असे चित्र रंगवण्यात राजकीय पक्षही यशस्वी झाले. भाजपच्या काही लोकांनी सोनूला दत्तक घेलते व त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला, असे राऊत यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.
एखादी राजकीय, शासकीय, प्रशासकीय यंत्रणा पाठीशी असल्याशिवाय सोनू सूद हे सर्व करू शकेल काय ? ”कुणाला मुंबईतून उत्तर प्रदेशात जायचे असेल तर आपल्या मोबाईल नंबरसह एक मेसेज करा. सोनू सूद तुम्हाला घरी पोहोचवेल”, असा प्रचार ठरवून झाला. त्या प्रचारासाठी मोठी राजकीय यंत्रणा कामाला लावली गेली. सरकार मजुरांसाठी काम करत नाही. पण सोनू सूद करतोय हे बिंबवण्याचा प्रयत्न झाला. सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातले काही राजकीय घटक ‘ठाकरे सरकार’ला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत होते, अशी टीका राऊत यांनी केली आहे.
“महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते बाबा आमटेंपर्यंत अनेकांची नावे आहेत, आता यामध्ये सोनू सूदचे नाव घेतले जाईल. मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करताना सोनूची छायाचित्र, व्हिडिओ प्रसिद्ध झाले. सरकार मजुरांना पोहचवण्यात अपयशी ठरले, पण सोनूसारखे महात्मा हे काम किती सहजतेने करत आहेत, असा प्रचार समाजमाध्यमांमध्ये सुरु झाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही, हे ‘महात्मा’ सूद याने दाखवून दिले,” अशी खोचक टीका या लेखातून केली आहे.
महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती, पोलीस, पालिका कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस, बँक कर्मचारी, गेल्या तीन महिन्यात जीवावर उदार होऊन कोरोनाशी लढत आहेत. त्यासंगळ्यांची यादी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी राजभवन प्रशासनाकडे पाठयला हवी, असा सल्लाही संजय राऊत यांनी लेखातून दिला आहे.