मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सिल्वर ओक येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
हेही वाचा- शरद पवारांना अडचणीत आणणारी ‘ईडी’ नक्की आहे तरी काय?
गेल्या दोन दिवसांपासून शरद पवारांच ईडी प्रकरण सुरू आहे. त्यामुळे आज मी त्यांना भेटण्यासाठी आलो होतो, असे संजय राऊत म्हणाले. शरद पवार यांचे ईडी प्रकरणात नाव असल्याचे कळताच शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. तसेच आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील आम्ही सुडाच राजकारण करत नाही, अन्याय झाल्यास पाठीशी असणार असे म्हटले होते.
दरम्यान, पवारांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी ही भेट राजकीय नसल्याचे सांगितले. पवारांशी माझे व्यक्तीगत सबंध आहेत. गेल्या काही दिवसाच्या राजकीय घडामोडी पाहता मी त्यांना भेटायला आलो होतो, असे राऊत यांनी सांगितले.