मुंबई - आमच्या विचारधारेचा इतरांनी विचार करण्याची आवश्यकता नाही, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला लगावला. याआधी भाजपचे काही लोक शरद पवरांसोबत होते तेव्हा विचारधारेची अडचण का आली नाही, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यासह पुढील २५ वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील, असा आत्मविश्वासही राऊत यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील राष्ट्रपती राजवटीनंतरही सत्ता स्थापन करण्याकरिता बैठकी सुरू आहेत. काल (गुरुवार) शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यामध्ये संयुक्तरित्या कॉमन मिनिमम प्रोग्रामवर बैठक झाली. यावर रोजच्या प्रमाणे प्रसारमाध्यमांना बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी बैठका व चर्चा चालूच राहणार असून, शिवसेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्षाचा नसून तो येणाऱ्या काळात ही २५ वर्षापर्यंत राहील, असे विधान केले. सत्ता वाटपाचे सूत्र काय असेल याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील, असेही राऊत म्हणाले.
एनडीएतून बाहेर पडल्याने शिवसेनेला तोटा नाही
शिवसेनेचे नेतृत्व हे महाराष्ट्रातच मोठ्या प्रमाणात आहे. आमचे जास्तीत जास्त लक्ष महाराष्ट्रावरच आहे. त्यामुळे आम्ही एनडीएतून बाहेर पडलो तरी त्याचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नसल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याने एनडीएच्या इतर घटक पक्षांमध्ये चलबिचल पाहायला मिळत आहे. झारखंडच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. तिथे रालोआचे घटक पक्ष लोक जन पार्टी आणि जनता दल (संयुक्त) ने निवडणुकांना स्वतंत्रपणे सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत भाजपचे नेतृत्व काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरेल.
हेही वाचा - BREAKING: मुख्यमंत्री निश्चितपणे शिवसेनेचा होणार - नवाब मलिक
आमच्या सहकाऱ्यांना सत्तेचा अनुभव
आम्ही ज्यांच्यासोबत जात आहोत त्यांना सत्ता चालवण्याचा चांगला अनुभव आहे. या अनुभवाचा आम्हाला फायदा होईल, अशी आशा संजय राऊत यांनी व्यक्त केली. पुढे बोलताना राऊत यांनी काँग्रेसच्या दिवंगत नेत्यांचीही स्तुती केली. महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये यशवंतराव चव्हाण यांचे मोठे योगदान आहे. स्वातंत्र्या चळवळीतही यशवंतराव, वसंतदादा पाटील यांचे योगदान आहे. त्यामुळे शिवसेनाही त्यांचा आदर करते, असे राऊत म्हणाले.
हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांच्या 'मी पुन्हा येईन'ची राऊत यांनी अशी उडवली खिल्ली
राणेंना सत्तास्थापनेसाठी शुभेच्छा
कोणत्याही परिस्थितीत भाजपचेच सरकार येणार, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले आहे. यावर संजय राऊत यांनी राणे यांना भाजप सरकार बनवण्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा असा खोचक टोला मारला. विचारधारेसंबंधी बोलताना राऊत म्हणाले, की आमच्या विचारधारेची फिकीर त्यांनी करू नये. याआधी तुमच्यातले अनेक जण शरद पवारांसोबत होते. यावेळी राऊत यांनी माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे स्मरण केले. त्यांचे योगदान महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे असल्याचे मत राऊत यांनी व्यक्त केले.