मुंबई : संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना बुडवली. आता ते महाविकास आघाडी बुडवणार आहेत अशा शब्दात दरेकर यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला आहे. याप्रसंगी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, संजय राऊत जेल मधून बाहेर आल्यानंतर बावचाळले आहेत. वारंवार कोर्टाचा अवमान करण्याचे काम त्यांनी सुरु केले आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे हे त्यांना वटणीवर आणू शकले नाही आहेत. स्वतः अजित दादांनी तशा प्रकारच व्यक्तव्य केले असल्याचेही दरेकर म्हणाले. संजय राऊत हे राष्ट्रवादी समवेत महाविकास आघाडी बनवायला निघाले आहेत. त्या पक्षाच्या प्रमुख नेत्याची काय भूमिका आहे? संजय राऊंतांच्या वागण्याच्या भूमिकेविषयी महाविकास आघाडीत उद्रेक होत आहे, हे आता सर्वांच्या लक्षात येत आहे, असेही दरेकर म्हणाले.
मराठा आरक्षणावर सरकार सकारात्मक : याप्रसंगी मराठा आरक्षणावर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी बैठक बोलावली होती. सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावर नेमक काय करायचं यावर भूमिका घेतली गेली आहे. इन चेंबर ने याचिका फेटाळली आहे. मराठा आरक्षणावर सरकार पूर्णतः सकारात्मक आहे. पुनर्विचार याचिका आहे त्यावर मेरिटवर युक्तिवाद होत असतो. शिफारस असल्यामुळे याचिका दाखल करण्यात आली. महाराष्ट्र सरकार कुठल्याही समाजात वाद होऊ देणार नाही. हीच सरकारची भूमिका आहे. सगळ्या समाजाला सुरक्षित ठेवून मराठा समाजाला कसा न्याय देता येईल? यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गंभीर आहेत, असे दरेकर म्हणाले.
खारघर घटनेबाबत सरकार संवेदनशील : खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या १४ श्री सेवकांच्या मुद्द्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, विरोधकांकडून मृत्यूच राजकारण होत आहे, हे फार दुर्देवी आहे. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी स्वतः सांगितलं आहे याच कोणी राजकारण करू नये? झालेली गोष्ट अतिशय दुर्देवी आहे. हे सरकारने मान्य केले आहे. याबाबत सरकार संवेदनशील आहे. पण त्या ठिकाणी कुठलेही शाही भोजन वैगरे नव्हते. पण त्या ठिकाणी मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारी अवलाद संजय राऊत यांच्यासारखी असल्यामुळे अशा प्रकारच वक्तव्य संजय राऊत करत आहेत, असेही दरेकर म्हणाले.