मुंबई - राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. तो वाढू नये म्हणून सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मंदिरे बंद ठेवण्यामागे विरोधकांनी मुख्यमंत्र्यांची भूमिका समजून घेतली पाहिजे. सरकारला मंदिरे बंद ठेवण्याची हौस नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. विरोधकांना आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, टोकाची भूमिका घेऊन त्यांनी राज्यातील जनतेचे अहित करू नये, असेही राऊत म्हणाले.
त्यांनी राज्यातील सनदी अधिकाऱयांच्या बदल्यांबाबतही आपले मत मांडले. कधी-कधी परिस्थितीमुळे वारंवार बदल्या कराव्या लागतात. कायद्याच्या कोणत्या पुस्तकात लिहिले आहे की वारंवार बदल्या करू नये? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. विरोधक सारखे म्हणत आहेत, की बदल्यांचे राजकारण सुरू आहे. त्यांनी समोर येऊन सांगावे कसले राजकारण सुरू आहे. अधिकाऱयांच्या बदल्या या राज्याच्या हितासाठी आहेत आणि त्या करण्याचा अधिकार जनतेने निवडून दिलेल्या सरकारला आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांनी केंद्र सरकारवरही टीका केली. कोरोनाच्या परिस्थितीत संपूर्ण मंत्रीमंडळ फिरून काम करत आहे. मात्र, देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री दिल्लीत बसूनच काम करत आहेत. पाकिस्तानच्या बाबतीत केंद्र सरकार नेहमीच आक्रमक होते. मात्र, चीनच्याबाबतीत सरकारचा हा आक्रमकपणा कुठे जातो? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्रात जी कोव्हिड सेंटर उभी केली आहेत, ती उत्तम प्रकारे काम करत असल्याचा दावा राऊत यांनी केला. पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. पांडुरंग रायकर यांना मी ओळखत होतो. रायकर यांच्या कुटुंबाची जबाबदारी घ्यावी, यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. त्यांना रुग्णवाहिका उशिरा मिळाली हे दुर्दैवच आहे. सरकारने याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले आहे.