मुंबई Sanjay Raut On Eknath Shinde : बिग बॉस विजेता एल्विश यादव याच्या विरोधात नोएडा येथील सेक्टर 49 पोलीस स्टेशनमध्ये विषारी सापांची तस्करी आणि बेकायदेशीर रेव्ह पार्टी केल्याच्या आरोपाखाली एफआयर दाखल झालीय. याप्रकरणी त्याच्या पाच साथीदारांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यात असलेले 9 विषारी साप आणि विषही जप्त करण्यात आलंय. ताब्यात घेतलेल्या सापांमध्ये कोब्रा जातीचे पाच साप, एक अजगर, दोन दुतोंडी साप आणि एका रॅट स्नेकचाही समावेश आहे. या कारवाईमुळं आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झालीये. गणपतीच्या दिवसात हाच युट्यूबर यादव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गणपतीच्या आरतीसाठी उपस्थित होता. त्यानं मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपतीची आरती देखील केली. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यानं चर्चांना उधाण आलंय.
संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका : या प्रकरणावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला असून, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत आपल्या निवासस्थानी बोलताना राऊत म्हणाले की, या महाराष्ट्रात अमली पदार्थांचा व्यापार वाढलेला आहे. याचं उत्तर राज्याचे गृहमंत्री यांना द्यावं लागेल. रेव्ह पार्टीमध्ये सापाच्या विषापासून तयार होणारे अमली पदार्थ सेवन करणारे वर्षावर पोहोचतात आणि त्यांचं नाव तुम्हाला माहीत आहे. पण, मुख्यमंत्र्यांना माहित नाही?' असा सवाल त्यांनी केला.
राज्याच्या गृहमंत्र्यांना उत्तर द्यावं लागेल : पुढं ते म्हणाले की, 'त्या यादवला एक खासदार मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जातो. त्यांना मिठ्या मारल्या जातात आणि त्याच्या हातून गणपतीची आरती देखील केली जाते. मुख्यमंत्री त्याच्या बाजूला उभे राहतात. देशात जो खतरनाक अमली पदार्थाचा व्यापार चाललाय त्याची सूत्रं मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आहेत का? याचा शोध घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांपर्यंत याला कोणी पोहोचविले? मुख्यमंत्र्यांच्या टोळीतील हे खासदार कोण आहेत? त्याचे काय आर्थिक संबंध आहेत? मुख्यमंत्र्यांच्या टोळीत कोण आहेत? याचं उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांना द्यावं लागेल', असं राऊत म्हणाले.
ड्रग्ज माफियांना प्रोटेक्शन दिलं जातंय : आता मुख्यमंत्र्यांनी बोलू नये 'मी तोंड उघडलं की तुमची तोंडं बंद पडतील' हा त्यांचा नेहमीचा शब्द आहे. पण, आधी तुम्ही तोंड उघडा. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यांपर्यंत एक व्यक्ती पोहोचतो हा मोठा विषय आहे. ललित पाटील असो किंवा दुसरा कोणी असो त्याला या राज्यातले मंत्री प्रोटेक्शन देत आहेत. या देशात दाऊद पासून इतरांना प्रोटेक्शन दिलं जात होतं. आता ड्रग्ज माफियांना अशा प्रकारचं प्रोटेक्शन दिलं जातंय, असा गंभीर आरोपही संजय राऊतांनी यावेळी केलाय.