मुंबई - अघोरी प्रयत्न करूनसुद्धा भाजपला मुख्यमंत्री लादता आला नाही, अशी भाजपवर टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच आमच्या सूर्ययानाने मंत्रालयावर सेफ लँडींग केले आहे आणि दिल्लीतही लँड करेल, यावर आश्चर्य वाटू नये. कितीही प्रयोग करा पण छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र तुटणार नाही, झुकणार नाही, विरोधकांना झुकवणार, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, चाणक्य ही मोठी उपाधी आहे. मी चाणक्य नाही, योद्धा आहे, शिवसैनिक आहे. मी लढतो, मला शिवसेनाप्रमुखांचा आशीर्वाद आहेत. माझी जबाबदारी संपली, आता माझे काम सामनाच्या कार्यालयात आहे. त्यामुळे उद्यापासून पत्रकार परिषद घेणार नाही, असे राऊत यांनी सांगितले.
हेही वाचा - तिन्ही पक्षांचा समान कार्यक्रम ठरला; आता एकोप्याने काम करणार - अशोक चव्हाण
मंगळवारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर अजित पवार यांनी रात्री राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी सुप्रिया सुळे त्यांच्या स्वागताला दारातच उभ्या होत्या.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली असल्याचे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांचा शपथविधी गुरुवारी शिवाजी पार्कवर होणार आहे.
हेही वाचा - आम्ही विरोधकांचा आवाज दाबणार नाही, आगे आगे देखो होता है क्या- सुप्रिया सुळे