मुंबई - राज्यातील दैनंदिन व्यवहार सुरू असतानाच मोठा राजकीय भूकंप झाला. शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर आज शिवसेनेचे खासदार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली आहे. बहुमत सिद्ध करता येईल, या भ्रमातून भाजप बाहेर पडेल, असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे.
बहुमत होतं तर चोरुन शपथविधी का केला?
पुढे बोलताना राऊत म्हणाले, भाजपने सचोटीचा व्यापार केला असता, तर भाजपवर ठोकर खाण्याची वेळ आली नसती. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे आमदार त्यांच्या-त्यांच्याकडे आहेत. या सर्वांचे मिळून 165 बहुमत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेली शपथ ही महाराष्ट्रातल्या जनतेलाच माहित नाही. जर यांना बहुमत होत, तर यांनी चोरून का शपथविधी केला? असा सवाल राऊत यांनी केला.
दरम्यान, राज्यपाल ज्यांच्या नावात भगवान शब्द आहे, जे आम्हाला एक न्याय देतात अन्ं भाजपाला वेगळा न्याय देतात. शिवसेना, राष्ट्रवादीला 24 तासांची मुदत दिली जाते. मात्र, भाजपाला 24 तासात बहुमत सिद्ध करावे असे न सांगता 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत का दिली? नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला तडा देण्याचा काम त्यांच्याच पक्षाचे लोक करत आहेत, अशी नाराजी संजय राऊतांनी व्यक्त केली.
त्याचसोबत पुढील 10 मिनिटात जरी राज्यपालांनी आम्हाला बोलाविले तरी बहुमताचा आकडा आम्ही 3 पक्ष सिद्ध करू शकतो. अजित पवारांनी आमदारांना फसविले, जे आमदार गायब आहेत ते देखील पुन्हा पक्षात परततील, असे संजय राऊतांनी सांगितले.
भाजप अंताची सुरुवात -
भाजपाचा हा शेवटचा डाव आहे त्यात ती फसली आहे. संजय राऊत हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. धमकविण्याचा प्रयत्न केल्यास त्याला मी घाबरणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. ज्या कोणाला मला उत्तर द्यायचं आहे त्यांनी मला उत्तर द्यावे, असे ते म्हणाले.
- राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे -
- महाविकासआघाडीकडे 165 आमदारांचे संख्याबळ
- अजित पवारांना फोडण्याचा डाव भाजपवर उलटला
- अजित पवारांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला
- भाजपने महाराष्ट्र आणि राजभवनाचा काळाबाजार केला
- खोट्या कागदपत्रांच्या आधारे राज्यपालांनी भाजपला सरकार बनवायला दिले