मुंबई : कोणताही राजकीय अजेंडा घेऊन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केलेली नाही. या यात्रेमागे राष्ट्रीय भावना आहे. त्यामुळे विरोधकांनी केवळ टीका न करता ती भावना समजून घ्यायला हवी. जवळपास साडेचार हजार किलोमीटर पर्यंतची भारत जोडो यात्रा राहुल गांधी यांनी पायी चालत पूर्ण करत आहेत. आपणही राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत काश्मीरमध्ये सामील झालो होतो. या यात्रेत त्यांच्यासोबत आपण 14 किलोमीटर पर्यंतचा प्रवास केला. या सर्व प्रवासात राहुल गांधी यांनी शिवसेना संघटना बाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपण जेव्हाही त्यांना भेटतो, त्यावेळी ते शिवसेना संघटना नेमकी कशी आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात असे संजय राऊत यांनी सांगितले. आज मुंबईत ठाकरे गटाकडून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.
आघाडीच्या युतीबाबत मिश्किल वक्तव्य : वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत मिश्किल वक्तव्य केले होते. अजून आमचे लग्न जुळलेले नाही. दोन्हीही पक्षाकडून एकमेकांवर लाईन मारण्याचे काम सुरू आहे, असो मिश्किल वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं. या त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या युतीबाबत उद्या बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या जाहीर मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलतील असे म्हटले आहे. याअगोदर वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे नव्या युतीबाबत प्रस्ताव पाठवला होता.
शिवसैनिकांचे सळसळते रक्त : सामाजिक कार्यासाठी नेहमीच शिवसेना पूर्ण राहिली आहे. गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईवर रक्तदान शिबिर आयोजित केली जातात. जेव्हा जेव्हा देशावर संकट आली युद्ध परिस्थितीत रक्ताची गरज भासली मागे हटला नाही. राष्ट्रीय आणि सामाजिक भावना लक्षात घेऊन शिवसैनिकांचे सळसळते रक्त नेहमीच दिले असल्याची आठवण ही संजय राऊत यांनी यावेळी करून दिली. भारत जोडो यात्रेत संजय राऊत हे स्थानिक शिवसेना नेत्यांसह राहुल यांच्या भारत जोडो यात्रेत गुरुवारी सहभागी झाले होते.