मुंबई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक राऊत यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आज (सोमवार) सायंकाळी अॅन्जीओग्राफी करण्यात येणार आहे.
पुढील काही दिवस संजय राऊत यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. डॉ. मॅथ्यू आणि डॉ. मेनन हे संजय राऊत यांच्यावर अॅन्जीओग्राफीची शस्त्रक्रिया करणार आहेत. त्यासोबतच डॉ. जलील पारकर देखील राऊत यांच्यावर उपचार करणार आहेत.
आज सायंकाळी संजय राऊत यांच्यावर अॅन्जीओग्राफी शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी दिली. गेल्या 15 दिवसांपासून संजय राऊत यांना छातीत दुखण्याचा त्रास होत होता. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आठवड्याभरापूर्वी त्यांचे संपूर्ण चेकअपही करण्यात आले होते. त्यांना इतर कोणताही त्रास नाही. राऊत यांच्यावर डॉ. जलील पारकर उपचार करणार असल्याची माहिती सुनील राऊत यांनी दिली.
गेल्या १५ दिवसांपासून राऊत हे शिवसेनेची भूमिका सातत्याने माध्यमांसमोर मांडत आहेत. अत्यंत आक्रमकपणे संजय राऊत ही शिवसेनेची भूमिका मांडत आहेत. शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा ही भूमिका त्यांनी सातत्याने माध्यमांसमोर मांडली आहे. तसंच शरद पवार यांच्या भेटीगाठीही घेतल्या. अशात आता सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला अवघे काही तास उरलेले असताना संजय राऊत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.