मुंबई : "मुंबई उत्तर पश्चिम विभागाचे खासदार गजानन किर्तीकर साडे तीन वर्षे निष्क्रिय होते. त्यांच्या विरोधात आंदोलन करायचे आहे. मात्र पोलीस परवानगी देत नाहीत. यामुळे आता मला या विरोधात कोर्टात जाऊन आंदोलनाची परवानगी मागावी लागेल", असा इशारा मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष व माजी खासदार संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी दिला आहे. (Sanjay Nirupam press conference).
परवानगी नाकारली : संजय निरुपम काँग्रेस कार्यालयात आयोजीत एका पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, "उत्तर पश्चिम विभागाचे खासदार गजानन किर्तीकर साडे तीन वर्षे निष्क्रिय होते. त्यानंतर ते शिंदे गटात गेले. त्यांच्या विरोधात आम्हाला बाईक रॅली काढण्यास बंदी घालण्यात आली. १७ नोव्हेंबरला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस महासंचालक यांना पत्र लिहिले पण त्याची साधी पोच पावती देण्यात आली नाही. ४ डिसेंबरला पुन्हा रॅली काढण्याची परवानगी मागितली असता ती नाकारण्यात आली."
असे पहिल्यांदा होत आहे : "अंधेरीच्या डीसीपी यांनी ६ डिसेंबरचे कारण दिले. तसेच कोणत्या घोषणा आणि फलक याची माहिती द्या असे पत्र दिले. कोणत्या घोषणा आणि फलक आणले जाणार हे आधी सांगा, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. हे राज्यात पहिल्यांदा होत आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी पोलिसांना समज द्यावी. आज आमच्या सोबत होत आहे, उद्या ते तुमच्या सोबत होणार आहे याची जाणीव सरकारने ठेवावी", असे आवाहन निरुपम यांनी केले.
तर कोर्टात जाऊ : "समिश्र वस्ती असल्याने कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो असे सांगितले जात असेल तर मुंबईत सर्वत्र समिश्र वस्ती आहे. महाराष्ट्रातील लोकशाही संपली आहे का? विरोधी पक्षाने घरात बसून राहायचे का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. निष्क्रिय खासदार विरोधात आंदोलन करायला परवानगी दिली जात नाही. आवाज उचलायला परवानगी दिली जात नाही. मी पुन्हा परवानगी द्यावी म्हणून पत्र देणार आहे. त्यानंतरही परवानगी दिली नाही तर मला कोर्टात जावे लागेल. कोर्टाने चपराक मारण्याआधी आम्हाला परवानगी देवून सरकारने राज्यात लोकशाही जिवंत ठेवावी", अशी मागणी निरुपम यांनी केली आहे.