मुंबई - काँग्रेस हा गुंडाचा पक्ष बनल्याची टीका करुन शिवसेनेत पक्षप्रवेश करणाऱ्या प्रियांका चतुर्वेदीला संजय निरुपम यांनी चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. तुम्ही तुमच्या वैयक्तीक महत्त्वाकांक्षेसाठी पक्ष सोडला, यामध्ये काही गैर नाही. मात्र, काँग्रेसबद्दल उगीचच चुकीचे मत मांडू नका, असे त्यांनी म्हटले आहे.
संजय निरुपम हे स्वतः एकेकाळी शिवसेनेचा उत्तर भारतीय चेहरा होते. नंतर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर, प्रियांका चतुर्वेदी यांनी तब्बल १० वर्षे काँगेस पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून घालवल्यावर आता शिवसेनेत दाखल होऊन शिवबंधन बांधून घेतले आहे.
निरुपम यांना शिवसेनेने 'दोपहर का सामना'च्या संपादक पदावर असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. त्यामुळेच निरुपम यांचे नाव राजकीय पटलावर नावारुपाला आले.
आज प्रियांका यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर त्यांनाही त्यांच्या तोलामोलाची कामगिरी सोपवू, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
एकीकडे प्रियांका यांनी काँगेस मधील गुंडगिरी आणि महिलांशी होणारी गैरवर्तणूक आवडली नसल्याने पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला असे सांगितले होते. शिवसेनेची कार्यपध्दती काँगेसपेक्षा फारच वेगळी आहे, असेही त्या म्हणाल्या.