मुंबई- करोना विषाणुच्या प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर बाजारात सॅनिटायझरचा तुटवडा होवू नये. काळाबाजार होवू नये, त्यांची अवाजवी किंमतीत विक्री होवू नये, यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मुंबई आणि कोकण विभागातील सर्व प्रमुख उत्पादक आणि वितरकांची बैठक घेतली. यानंतर राज्यातील सॅनिटायझर व मास्कचा तुटवडा लवकरच पूर्ववत होणार असल्याचे शिंगणे यांनी ईटीव्ही भारतच्या प्रतिनीधीशी बोलताना सांगितले आहे.
आजच्या बैठकीला सॅनिटायझर, मास्क उत्पादक आणि प्रमुख वितरकांचे प्रतिनिधी हजर होते. सदर बैठकीत उत्पादकांकडे सध्याच्या परिस्थितीत किती साठा शिल्लक आहे, त्यांची उत्पादन क्षमता किती आहे, याचसोबत बाजारातील मागणीचाही आढावा मंत्री शिंगणे यांनी घेतला आहे.
कोणत्याही परिस्थितीत बाजारात सॅनिटायझरचा तुटवडा, काळाबाजार, जास्त किंमत आकारणी होणार नाही, याबाबत काळजी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. कच्चा मालाचा तुटवडा तसेच पॅकिंग मटेरिअल, जे प्रामुख्याने चीन येथून येत होते त्याचा तुटवडा उत्पादकांना उत्पादन वाढवण्यास अडचणीचे ठरत असल्याचे उत्पादकानी सांगितले. पम्पपॉकिंग बॉटल ऐवजी साध्या बॉटल वापरल्यास उत्पादकांना पॉकिंग मटेरियलचा तुटवडा भासणार नाही. इतर कच्चेमाल जसे अल्कोहोल, इतर रासायनिक द्रव्यांचा पुरवठादाराकडून पुरवठा होण्यास ज्या काहीअडचणी असतील त्या संबंधित विभागाशी संपर्क करून तोडगा काढण्यात येईल. असेही त्यांनी आश्वासित केले आहे.
सॅनिटायझर, सर्जिकल मास्क आणि एन-९५ मास्कचा समावेश केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तुंमध्ये करण्यात आले असल्याचे सर्व उपस्थितांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. काळाबाजार केल्यास जीवनावश्यक वस्तु कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल, अशी तंबी पण दिली आहे. उत्पादकांनी त्यांच्या उत्पादन केलेल्या मालावर कोणत्याही प्रकारचे प्रतिबंधित जाहिराती करु नये, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. वेळप्रसंगी २ किंवा ३ शिफ्टमध्ये उत्पादन व चाचणी विभाग सुरु ठेवण्याची तयारी उत्पादकांनी दाखवली. तसेच जे काळाबाजार करत आहेत त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत, असे मंत्र्यांनी सांगितले.