मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राज्याचा विकास आणि त्यासंदर्भातील काम मी पाहतोय. राज्याला त्यांच्या माध्यमातून एक विश्वासक नेतृत्व मिळालेले आहे. त्यामुळेच नवी मुंबईचाही विकास त्यांच्या माध्यमातून व्हावा यासाठी मी आज आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
संदीप नाईक म्हणाले की, मी आज विचार करूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेच्या सदस्याचा राजीनामा दिला आहे. नवी मुंबईचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यासोबतच या ठिकाणी चांगले प्रकल्प यावेत आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जावेत यासाठी मी हा निर्णय घेतला असून मी लवकरच भाजपात प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून विकास कामे पाहायला मिळत आहेत. नवी मुंबईतील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि नवी मुंबईचा विकास करण्यासाठी मी भाजपात जात असल्याचेही नाईक म्हणाले.आपल्या सोबत कुटुंबातील इतर सदस्य भाजपात येत नाहीत या संदर्भात विचारले असता ते म्हणाले की, मी माझा निर्णय मी घेतला आहे. कुटुंबानेच मला तो निर्णय घेण्याचा अधिकार सोपवला आहे. त्यामुळे मी माझा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या निर्णयावर मी बोलणे योग्य होणार नाही. ते काय निर्णय घेतील हे मी सांगू शकत नाही. भाजपात प्रवेश केल्यानंतर पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी पार पाडेन. येत्या काळात मला चांगले काम करण्याची यातून संधी मिळणार असल्याचेही ते म्हणाले.