मुंबई - मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग या राज्य सरकारच्या ड्रीमप्रोजेक्टला मजुरांच्या स्थलांतराचा मोठा फटका बसला आहे. दोन महिन्यांत या प्रकल्पात काम करणारे तब्बल 10,500 मजूर आपापल्या गावी परतले आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाचा वेग मंदावला असून आता प्रकल्प रेंगाळत प्रकल्पाचा खर्च वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई ते नागपूर प्रवास सुपरफास्ट करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आहे, तर हा प्रकल्प शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा (एमएसआरडीसी) मानस आहे. त्यामुळेच अगदी लॉकडाऊनमध्येही काम सुरू आहे. पण आता मात्र या कामाचा वेग मंदावला आहे.
प्रकल्पाच्या 16 पॅकेजमध्ये फेब्रुवारी 2020 पर्यंत 20 हजार मजूर काम करत होते. यातील मोठ्या संख्येने स्थलांतरित मजूर आहेत. त्यामुळेच कोरोनाचे संकट आल्यानंतर आणि लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर स्थलांतरित मजूर कमी कमी होऊ लागले. मजूर गावी परतू लागले. त्यातूनच जिथे फेब्रुवारीमध्ये 20 हजार मजूर होते तिथे 14 एप्रिलला 14450 मजूर राहिले, तर आता मजुरांना गावी जाण्याची परवानगी मिळाल्यानंतर 5000 ने मजुरांची संख्या कमी झाली आहे.