मुंबई Sameer Wankhede Met Sanjay Raut: आज मुंबईतील भांडुपमध्ये एका कार्यक्रमात खासदार संजय राऊत आणि 'एनसीबी'चे माजी संचालक समीर वानखेडे हे एकत्र आले होते. या कार्यक्रमात दोघे एकाच व्यासपीठावर होते. कार्यक्रम संपल्यानंतर दोघांमध्ये हस्तांदोलन, चर्चा तसेच विचारपूस झाली. हा कार्यक्रम झाल्यानंतर काही वेळानं समीर वानखेडे यांनी संजय राऊतांच्या भांडुपमधील राहत्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. दरम्यान, या भेटीवरुन बरीच उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पण या भेटीचं नेमकं कारण काय, हे अद्याप अस्पष्ट आहे.
समीर वानखेडे राजकारणात येणार? मुंबई 'एनसीबी'चे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी नुकतीच वाशिमच्या एका वृत्तपत्रात शेतकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छांची जाहिरात दिली होती. त्यांच्या या जाहिराती नंतर राजकीय वर्तुळात समीर वानखेडे हे राजकारणात येणार आहेत, अशा चर्चा रंगल्या आहेत. मात्र आता या चर्चांवर थेट समीर वानखेडे यांनी उत्तर दिलं आहे.
शिंदे, ठाकरे गटात वादाची ठिणगी: राज्यभर दिवाळी साजरी होत असताना आणि दिवाळीचे फटाके फुटत असताना काल (शनिवारी) मुंब्र्यात ठाकरे गटाची शाखा तोडण्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटांमध्ये चांगलीच जुंपली. शाखेवरून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शाखा तोडण्यावरून शिंदे गटावर हल्लाबोल केला.
मुंब्रा शाखेवरून संजय राऊतांचा इशारा: शिवसेनेच्या शाखा तुमच्या बापाच्या नाहीत. या शिवसेनेच्या शाखा बाळासाहेबांच्या आहेत. बाळासाहेब ठाकरेंशी तुमचे काहीही नाते नाही. मिंधे गट हे भाजपाचे मांडलिक आहेत, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधलाय.
डुप्लीकेट शिवसेनेचा माज शिवसैनिकांनी उतरवला : डुप्लीकेट शिवसेनेनं जो माज दाखवला, तो माज काल (शनिवारी) हजारो शिवसैनिकांनी उतरवला. ते सत्तेच्या जोरावर ते फुरफुरत होते. त्यांचं काय करायचं ते पाहू. यापुढं कुठल्याही शाखेवर आक्रमण किंवा अतिक्रमण केलं तर काल फक्त एक झलक होती. याच पद्धतीनं सामुदायिकपणे तोडीस तोड उत्तर आणि प्रतिहल्ला केला जाईल. काल पोलिसांनी चोरांचं रक्षण केलं हे पोलिसांचं काम नाही. आम्हाला राज्याचं वातावरण बिघडवायचं नाही. जेव्हा गद्दारांच्या हातात सत्ता जाते, तेव्हा ते रावण होतात, असा घणाघातही संजय राऊतांनी केलाय.
हेही वाचा: