मुंबई - कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा झालेला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे आर्थिक बजेट पूर्णपणे काेलमडले आहे. प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाला काेराेनामुळे खीळ लागल्याने महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. ऑगस्ट महिन्याचे 12 दिवस झाले तरी अद्याप जुलै, 2021 महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून त्यांना आर्थिक संकटाला ताेंड द्यावे लागत आहे. गेल्या वर्षी वेतनासाठी दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. अजून किती आत्महत्यांची प्रतीक्षा सरकार आहे, असा प्रश्न एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी उपस्थितीत केला आहे. वेतनाबाबत एसटी महामंडळाविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
मदतीसाठी शासनाला प्रस्ताव
मागील वर्षी कोरोनामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा झालेला होता. त्यामुळे कामगारांना पगार देण्यासाठी एसटी महामंडळाकडे पैसे नव्हते. परिणामी कामगारांचे वेतन थकीत होते. त्यामुळे गेल्या वर्षी एसटी बस वाहतूक बंद असताना शासनाकडून मिळालेल्या एक हजार कोटी रुपयांच्या निधीतून कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले होते. त्यानंतर सवलत मूल्याच्या रक्कमेतून अकराशे काेटी, असे एकुण 2 हजार शंभर काेटी रुपये दिल्याने जून महिन्यापर्यंतचे पगार महामंडळाने दिला आहे. पण, आता हा निधीसुद्धा संपला असून कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात काेराेनाचे रुग्ण संख्या घटली असले तरी एसटीच्या सुमारे दहा हजार बस रस्त्यावर धावत आहेत. पण, प्रवाशांची संख्या काही वाढलेली नाही. त्यामुळे एसटीला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. सध्या दिवसाला फक्त नऊ काेटी रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यापैकी साडे आठ काेटी रुपये डिझेलवर खर्च हाेतात. त्यामुळे महिन्याला वेतनासाठी लागणारे सुमारे 290 काेटी रुपयांचा निधी उभा करणे महामंडळाला अशक्य हाेत आहे. त्यामुळे आता पुन्हा आर्थिक मदतीसाठी एसटी महामंडळाने राज्य सरकारला प्रस्ताव पाठविला आहे.
आणखी किती आत्महत्या करायच्या
एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन पुन्हा रखडलेले आहे. हे किती दिवस चालणार असा प्रश्न एसटी कर्मचारी विचारत आहेत. महिनाभर काम करूनही घरी भाजीपाला आणि किराणा भरायला पैसे नाहीत, औषध आणायला पैसे नाहीत. अशी अवस्था सध्या एसटी कर्मचाऱ्यांची झाली आहे. कोरोना काळात स्वतःच्या जीवाची काळजी न करता आपली सेवा बजावली आहे. ही सेवा बजावत असताना राज्यभरतील 302 एसटी कर्मचाऱ्यांच्या कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. राज्याच्या मदतीसाठी धावून येणारे एसटी कर्मचाऱ्यांची आजही सरकारकडून उपेक्षा का होते, वेतनासाठी गेल्या वर्षी दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे.आणखी किती आत्महत्याची प्रतीक्षा सरकार आहे, असा प्रश्न एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी उपस्थितीत केला आहे. तसेच एसटी कामगार संघटनेची एक बैठक झाली आहे. या बैठकीत इतर संघटना एकत्र घेऊन राज्य सरकार व एसटी महामंडळाविरोधात एक संग्राम उभारणार आहोत. या महासंग्रामाची आम्ही तयारी केली आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवणे चुकीचे
एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन सतत रखडत असल्याने एसटी कामगार संघटना एसटी महामंडळाविरोधात न्यायालयात धाव घेणार आहे. तसेच सध्या एसटी महामंडळाकडे डिझेलची कमतरता असल्याने आगारारात बस गाड्या उभ्या केल्या जात आहेत. डिझेल नसल्याचे कारण देत एसटी कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा खेळ सध्या सर्रासपणे सुरू आहे. वेतन करारानुसार, कोणत्याही कारणास्त ड्युटी नाकारली गेली त्या दिवशीचा पगार द्यावा, अशी तरतूद आहे. मात्र, महामंडळाकडून अशा प्रकारची सक्तीची रजा देणे अत्यंत चुकीचे असल्याचेही संदीप शिंदे म्हणाले.
हेही वाचा - नवी मुंबईतील प्लॅब परीक्षा सेंटर उडवून देण्याची तालिबानी दहशतवादी संघटनेची धमकी