मुंबई - जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त आज(19ऑगस्ट) 'सलाम बॉम्बे फाउंडेशन'च्या मीडिया आकादमीतर्फे सीएसटी स्थानकात समुद्रकिनाऱ्यांबद्दल जनजागृती करणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. पालिकेच्या शाळांमधील मुलांनी काढलेल्या छायाचित्रांचा या प्रदर्शनात समावेश करण्यात आला होता. सकाळी 10 वाजता सुरू झालेले हे प्रदर्शन सायंकाळी 4 वाजेपर्यंत प्रेक्षकांसाठी खुले होते.
प्रदर्शनात समुद्रकिनाऱ्यावरील हाणीकारक कचरा, समुद्रकिनारी कचरा करणारे लोक याची पालिकेच्या शाळेतील मुलांनी टिपलेली छायाचित्रे लावण्यात आली होती. याशिवाय लोकांनी समुद्रात घाण टाकू नये, याविषयी जनजागृती करणाऱ्या छायाचित्रांचाही या प्रदर्शनात समावेश होता. या प्रदर्शनापूर्वी सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या मीडिया आकादमीतर्फे मुलांना फोटोग्राफीचे धडे देखील देण्यात आले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी रेल्वेस्थानकात नागरिकांनी गर्दी केली होती.