मुंबई - देशभरातील बंजारा बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या बंजारा समाजाचे धर्मगुरू संत रामराव महाराज यांचे शुकवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 85 वर्षांचे होते. संत रामराव महाराज हे वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी संस्थानचे प्रमुख होते. त्यांच्या निधनावर सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. बंजारा समाजाचे धर्मगुरू, तपस्वी डॉ. रामरावजी महाराज यांच्या निधनामुळे आम्ही थोर समाजसुधारक आणि आध्यात्मिक मार्गदर्शक गमावले आहेत, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले दुःख
डॉ. रामरावजी महाराज यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांचे लाखो अनुयायी आहेत. त्यांच्या निधनामुळे आज प्रत्येक वाडी-तांड्यावर शोककळा पसरली आहे. बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले. त्यांचे कार्य केवळ बंजारा समाजापुरते मर्यादित नव्हते, तर इतर समाजांसाठीही ते प्रेरणास्थान होते. डॉ. रामरावजी महाराज यांचे चव्हाण कुटुंबाशी डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या काळापासून जिव्हाळ्याचे नाते होते. ते आमचे मार्गदर्शक होते व त्यांचा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी होता. त्यांच्या दर्शनानंतर समाधानाची अनुभूती होत असे. त्यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.
बाळासाहेब थोरात यांच्या भावना
आपल्या प्रवचनातून त्यांनी रुढीवादी, अशिक्षित बंजारा समाजामध्ये शिक्षणाप्रती जागृती निर्माण केली, समाजाला नवी दिशा दिली. त्यांच्या निधनाने एक महान तपस्वी काळाच्या पडद्याआड गेले, अशा भावना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत. समाजातील अनिष्ट परंपरा बंद करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. बालविवाह होऊ नयेत यासाठी त्यांनी समाजात मोठ्या प्रमाणात जागृती केली, व्यसन मुक्तीसाठी त्यांनी मोठे कार्य केले. रामराव महाराज या थोर संताच्या निधनाने बंजारा समाजाची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत बाळासाहेब थोरात यांनी श्रद्धांजली अर्पण केली.