मुंबई - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशभर वाढत चाललेला आहे. एकामागोमाग एक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे राज्यात अनेक रुग्णालये उपचारासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. यामध्ये मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयातदेखील कोरोना संशयित रुग्ण ठेवले जातील, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. पण रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा याला विरोध आहे.
प्रशासनाने कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य दिलेले नाही. त्यामुळे त्यांचा विरोध आहे. हे रुग्ण आणून प्रशासन जिवाशी खेळत आहे, असे कर्मचारी सांगत आहेत. मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटल हे राज्य शासनाचे महत्त्वपूर्ण रुग्णालय आहे. याठिकाणी उपचाराची विशेष सोय आहे. परंतु या रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जे सेफ्टी साहित्य दिले जाते ते अद्याप मिळालेले नाही. त्यामध्येच प्रशासनाने कोरोना विषाणू संशयित रुग्ण या ठिकाणी आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांच्या जिवाशी खेळून प्रशासन आम्हाला काम करायला लावत आहे, असे म्हणत सेफ्टी द्या अन्यथा आम्ही काम करणार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
सेंट जॉर्ज रुग्णालयात आया, परिचारिका, वॉर्डबॉय आणि इतर साफसफाई कर्मचारी आहेत. त्यांना प्रशासनाने अद्याप सेफ्टी कीट दिलेली नाही. जुन्याच एचआयव्ही कीट आम्हाला दिलेल्या आहेत त्यामुळे आम्ही रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेतो, परंतु आमच्या आरोग्याचे काय असा प्रश्न कर्मचारी विचारत आहेत. तसेच साफसफाई करणारे 70 ते 80 कर्मचारी आहेत त्यांनादेखील कोणत्याही प्रकारची सुविधा प्रशासनाने दिली नाही. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या दोन दिवसांपासून सेंट जॉर्ज रुग्णालयात कोरोना संशयित रुग्ण आणले जात आहेत. याची माहिती अद्याप रुग्णालयातील अधीक्षकांनी कर्मचाऱ्यांना दिलेली नाही. जे रुग्ण आणलेले आहेत. त्यांच्याबाबत ही स्पष्टता रुग्णालय करत नाही. त्यामुळे रुग्णांच्या जवळ असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच माहिती नसेल तर कर्मचाऱ्यांच्या जीवाशी प्रशासन खेळत आहे, असे कर्मचारी वर्गाचे म्हणणे आहे. सेफ्टी मिळत नाही तोपर्यंत आम्ही काम करणार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.