मुंबई - पालघरमध्ये दोन साधूंची झालेली हत्या ही अत्यंत दुर्दैवी घटना असून हे प्रकरण महाविकास आघाडी सरकारने गंभीरपणे हाताळत तब्बल २२९ जणांना अटक केली, १५४ जणांना हत्येच्या आरोपाखाली तर ७५ जणांवर जमावबंदी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. हे प्रकरण निष्काळजीपणे हाताळणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करून प्रकरण सीआयडीकडे दिले. आता या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना सात महिन्यांनंतर भाजपाकडून हीन दर्जाचे राजकारण केले जात आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला आहे.
कोरोनोच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने छटपूजा साजरी कराण्यावर निर्बंध घातले आहेत. यावर भाजपा नेत्यांनी हिंदुत्वविरोधी भूमिका आहे, असा कांगावा केला. परंतु असेच निर्बंध गुजरात व हरियाणा या भाजपाशासित राज्यांनीही घातले आहेत. या भाजपा नेत्यांनी आपल्याच हाताने आपलेच तोंड काळे करुन घेतले आहे, असेही सावंत म्हणाले.
म्हणून सीबीआय चौकशीची मागणी-
यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, ज्या गावात ही दुर्घटना घडली ते गडचिंचले गाव भाजपाचा गड म्हणून ओळखाले जात आहे. १० वर्ष तेथे भाजपाचा सरपंच आहे. आरोपी क्रमांक ६१ व ६५ यांच्या समवेत अटक करण्यात आलेले भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. या प्रकरणातून भाजपाच्या लोकांना वगळता यावे, यासाठीच सीबीआय चौकशीची मागणी भाजपाकडून केली जात आहे. यासाठी भाजपाने केलेल्या नौटंकी आंदोलनात ‘राम’ नसून ‘झांसाराम’ आहे, असा टोला सावंत यांनी राम कदम यांना लगावला आहे.
भाजपाचा दाभिंकपणा-
देशभरातील इतर राज्यात झालेल्या साधु, संतांच्या हत्येवर भाजपा काहीच बोलत नाही. उत्तर प्रदेश मध्ये साधुंची हत्या झाली, कर्नाटकात तीन-तीन पुजाऱ्यांच्या हत्या झाल्या. पण त्यावर भाजपा काहीच बोलत नाही. फक्त महाराष्ट्रातील साधूंच्या हत्यांवर भाजप बोलते यातून त्यांचा दांभिकपणा दिसत आहे. साधुंची हत्या, मंदिराच्या प्रश्नावरुन भाजपा हिन राजकारण करत आहे, असेही सावंत म्हणाले.