मुंबई - देशाचे गृहमंत्री अमित शाह हे देशाच्या 130 कोटी जनतेला फसवू शकतात, मग उद्धव ठाकरे काय आहेत? असे टोला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला. गृहमंत्री अमित शाह यांनी काल (रविवारी) सिंधुदुर्गमध्ये भाजप नेते काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या लाईफटाईम या वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. तर अमित शाह यांचे भाषण देखील हा चुनावी जुमला असू शकतो, अशी टीका सावंत यांनी केली.
काय म्हणाले होते अमित शाह?
जनमताचा अनादर करत, पवित्र युती सोडून शिवसेनेने सत्तेसाठी लाचार होत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे तीन चाकी ऑटोरिक्षा सरकार असल्याचेही ते म्हणाले होते. तसेच हे या ऑटोरिक्षाचे प्रत्येक चाक वेगवेगळ्या दिशेला जात आहे. बाळासाहेब ठाकरे तर गेले, पण आता शिवसेनेचे नेते राजकारणासाठी तत्वांना तोडत आहेत. ते तत्वासाठी राजकारणात आलेले नसून राजकारणासाठी तत्व तोडणारे आहेत,अशा शब्दात अमित शहा यानी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. जनादेशाचा आदर न करता आम्ही वचन तोडलं, असं खोटंनाटं सांगून आम्हाला बदनाम केलं आणि दगाबाजी केली. आम्ही जनादेशाचा अनादर केलेला नसून, त्यांनीच जनादेशाचा अनादर केला आणि सत्तेसाठी लाचारी पत्करली अशा शब्दात शाह यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. शिवसेनेने महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर भाजपची बदनामी सुरू केली. मात्र, बिहारमध्ये आम्ही दिलेला शब्द पाळला होता. मी कधीही बंद दारामागे चर्चा करत नाही. शिवसेना ज्याप्रकारे वागली, तसे भाजपने केले असते तर आज राज्यात शिवसेनेचे अस्तित्व राहिले नसते असेही शाह म्हणाले.
हेही वाचा - आंदोलनजीवी म्हणत पंतप्रधानांनी विरोधकांना मारला टोला
विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री कोण होणार? या मुद्यावर भाजप आणि शिवसेना यांच्यात महायुती तुटून शिवसेना बाहेर पडली. भाजपने मुख्यमंत्री पदासाठीचा दिलेला शब्द पाळला नाही म्हणून आम्ही युतीतून बाहेर पडत असल्याचे उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले होते. मात्र, आपण असा कोणताच शब्द दिलेला नव्हता, असा खुलासा गृहमंत्री अमित शाह यांनी काल आपल्या भाषणादरम्यान केला. त्यामुळे पुन्हा एकदा त्यावेळी काय झालं? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सचिन सावंत यांची टीका -
अमित शाह हे 130 कोटी जनतेला फसवू शकतात. तर उद्धव ठाकरे यांना फसवले यात आश्चर्य नाही, या शब्दात सचिन सावंत यांनी टीका केली. काल अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी इंधन दर कमी करण्यास असमर्थता दर्शवत इंधनावर राज्य सरकारचा कर अधिक असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. मात्र, इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. केंद्र सरकार हातावर हात धरून असून, केवळ पेट्रोलच्या कर रूपात 20 लाख कोटींपेक्षा जास्त पैसा केंद्राने गोळा केले आहे. तरी इंधन दरवाढीच्या कोणतीच सवलत दिली जात नाही. याउलट 'अबकी बार, पेट्रोल सौ पार' असे म्हणायची वेळ आली आहे. तर अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केवळ निवडक उद्योगांसाठी हे अर्थसंकल्प मांडला आहे. अर्थमंत्री जिथे अर्थसंकल्पाबाबत चर्चा करायला जातात तिथे केवळ उद्योगपती असतात. सामान्य जनतेचा एकही प्रतिनिधी नसतो, असा आरोपही सचिन सावंत यांनी केला.