मुंबई - काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी जर भाजपचे सरकार यावे, या इच्छेने आडमुठी भूमिका घेतली नसती तर वंचितचे अनेजण आज मंत्रिमंडळात असते असे म्हणत सांवतांनी आंबेडकरांना टोला लगावला. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान केल्याचेही सावंत म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांनी आपल्या कार्यकर्त्यांची केवळ फसवणूकच नाहीतर राजकीय नुकसानही केले आहे. पदाधिकाऱ्यांची घोर निराशा त्या भावनेचे निदर्शक असल्याचेही मत सावंत यांनी व्यक्त केले. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. वंचितने काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर यावे अशी अनेक नेत्यांची भूमिका होती. मात्र, वंचिने स्वतंत्र निवडणूक लढवली त्याचा फटका त्यांना बसला मात्र, अनेक ठिकाणी भाजपला त्याचा फायदा झाल्याचे पाहायला मिळाले.
वंचित बहुजन आघाडीच्या राज्यभरातील प्रमुख 45 नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचा आणि पक्षाचा राजीनामा सामूहिकपणे आंबेडकरांना पाठविला आहे. राजीनामा देणाऱ्या प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये अकोल्यातील माजी आमदार हरिदास भदे, बळीराम सिरस्कार यांचा समावेश आहे. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या 'महाविकास आघाडी'सह भाजपला पर्याय निर्माण करण्याचे आंबेडकरांचे प्रयत्न आहेत. मात्र, राज्यातील तिसऱ्या राजकीय शक्तीचं स्वप्नं पाहणाऱ्या आंबेडकरांच्या प्रयत्नांना या सामूहिक बंडामूळे मोठी खिळ बसली.