मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी एम्सने अहवाल सादर केला. त्यामध्ये सुशांतची हत्या नाही तर आत्महत्याच असल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे. मात्र, सुशांतची हत्या झाली आहे, असा कांगावा करत मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांची आता बोलती बंद झाली आहे. आता मुंबई आणि महाराष्ट्राची नाहक बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेचा आणि हाथरस प्रकरणात शेपुट घालून बसणाऱ्या माध्यमांसह राजकीय पुढाऱ्यांचा कंडू शमला काय? असा सवाल शिवसेनेने मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.
एम्स’ने सुशांतप्रकरणी जो अहवाल दिला, तो अंध भक्त नाकारणार आहेत काय? सुशांत राजपूतच्या दुर्दैवी मृत्यूस 110 दिवस झाले. या काळात मुंबई पोलिसांची ज्यांनी यथेच्छ बदनामी केली, मुंबई पोलिसांच्या तपासावर ज्यांनी रोज प्रश्नचिन्ह निर्माण केले, त्या राजकीय पुढाऱ्यांनी, कुत्र्यासारख्या भुंकणाऱ्या गलिच्छ वृत्तवाहिन्यांनी महाराष्ट्राची माफीच मागायला हवी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
मागच्या शंभर दिवसांत महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली, अशा गुप्तेश्वरी नट्या आणि ‘गुप्तेश्वर’ आता कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत? जे महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या वाटेला गेले त्यांचे साफ वाटोळे होते. बेइमान, हरामखोरांनी हे आता तरी समजून घ्यावे. हाथरस बलात्कार प्रकरणात शेपूट घालून बसणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या मर्दानगीची परीक्षा घेऊ नये!, असा टोलाही शिवसेनेने कंगना रणौतसह सुशांतची बाजू घेऊन पोलिसांची बदनामी करणाऱ्या भाजपला लगावला आहे.
काय म्हटले आहे सामनात
ज्यांनी महाराष्ट्राची यथेच्छ बदनामी केली, त्यांचे पुरते वस्त्रहरणच झाले आहे. एम्स’चे डॉ. सुधीर गुप्ता हे शिवसेनेच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख नाहीत. मात्र, याच ‘एम्स’मध्ये गृहमंत्री अमित शहा हे उपचारांसाठी दाखल झाले व बरे होऊन घरी परतले. ज्या ‘एम्स’वर देशाच्या गृहमंत्र्यांचाच विश्वास आहे, त्या ‘एम्स’ने सुशांतप्रकरणी जो अहवाल दिला, तो अंध भक्त नाकारणार आहेत काय? असा सवाल शिवसेनेने अंधभक्तांना केला आहे.
मुंबई पोलिसांची ज्यांनी यथेच्छ बदनामी केली, मुंबई पोलिसांच्या तपासावर ज्यांनी रोज प्रश्नचिन्ह निर्माण केले, त्या राजकीय पुढाऱयांनी, कुत्र्यासारख्या भुंकणाऱया गलिच्छ वृत्तवाहिन्यांनी महाराष्ट्राची माफीच मागायला हवी. या सगळय़ांनी महाराष्ट्राच्या प्रतिमेस ठरवून कलंक लावण्याचा प्रयत्न केला. हे एक कटकारस्थानच होते. सबब, या सगळ्यांवर महाराष्ट्र सरकारने अब्रुनुकसानीचा दावाच ठोकला पाहिजे, असेही सुचक वक्तव्य महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या शिवसेनेने केले आहे.
सुशांत वैफल्य, नैराश्याने ग्रासलेला होता.आयुष्याची उताराला लागलेली गाडी त्याला सावरता येत नव्हती. त्या धडपडीत तो भयंकर अशा अमली पदार्थांच्या नशेच्या आहारी गेला व एक दिवस गळफास घेऊन त्याने जीवन संपवले. सुशांतच्या पाटण्यातील कुटुंबाचा वापर स्वार्थी, लंपट राजकारणासाठी करून केंद्राने हा तपास सीबीआयकडे ज्या जलदगतीने पोहोचवला ते पाहता ‘बुलेट ट्रेन’चा वेगही मंद पडला असेल, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे. तसेच मुंबई पोलिसांनी तपासात जी नैतिकता व गुप्तता दाखवली ती एखाद्याचे मृत्यूनंतर धिंडवडे निघू नयेत यासाठीच असल्याचे सांगत मुंबई पोलिसांची पाठराखण केली आहे.
सुशांत प्रकरणाचे भांडवल करून महाविकास आघाडीचे सरकार व मुंबई पोलिसांची ‘मीडिया’ ट्रायल केली! स्वतःच पत्रकारितेतील हरिश्चंद्राचा अवतार समजणारे प्रत्यक्षात हरामखोर, बेइमानच निपजले! असल्याचे म्हणत शिवसेनेने माध्यमांवरही आगपाखड केली आहे. तसेच अशा बेइमानांच्या विरोधात मराठी जनतेने ठाम भूमिका घेतलीच पाहिजे, असे आवाहनही त्यांनी मराठी जनतेला या अग्रलेखाच्या माध्यमातून केले आहे.
ते बलात्कारी कंगनाचे नातेवाईक आहेत काय?
सुशांतच्या मृत्यूचे ज्यांनी भांडवल केले, मुंबईला पाकिस्तानची, बाबराची उपमा दिली त्या नटीबाई आता कोणत्या बिळात लपल्या आहेत? हाथरसमध्ये एका तरुण मुलीवर बलात्कार करून मारले, तेथील पोलिसांनी त्या मुलीचा देह विटंबना करून काळोखात जाळला याबद्दल त्या नटीने डोळ्यात ग्लिसरीन घालूनसुद्धा दोन अश्रू ढाळले नाहीत. ज्यांनी त्या मुलीवर बलात्कार केला ते या नटीबाईचे भाईबंद आहेत का? ज्या पोलिसांनी त्या मुलीस जाळले ते पोलीस त्या नटीबाईचे घरगडी आहेत काय? ज्यांनी मागच्या शंभर दिवसांत महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली, अशा गुप्तेश्वरी नट्या आणि ‘गुप्तेश्वर’ आता कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत? असा सवाल करत कंगणाचा आणि यूपी पोलिसांचाही समाचार घेतला आहे.