मुंबई - सीबीएसई, आयसीएसई आणि राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत ९० टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांची संख्या सुमारे ४० टक्केच्या दरम्यान वाढली आहे. यामुळे शहरी भागातील नामांकित महाविद्यालयांमध्ये पदवीच्या प्रवेशासाठी मोठी चुरस पाहावयाला मिळणार आहे. या नामांकित महाविद्यालयांमध्ये ९० टक्केहून अधिक गुण मिळवूनही अनेकांना प्रवेश मिळणे कठिण होणार असल्याचे मत शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त् केले जात आहे.
सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेचाही मागील काही दिवसांत निकाल जाहीर झाला आहे. देशभरात १ लाख ५७ हजार ९३४ विद्यार्थ्यांनी ९० टक्के आणि त्यातून अधिक गुण मिळवले. ९५ टक्के आणि त्याहून अधिक गुण ३८ हजार ६८६ विद्यार्थ्यांनी मिळवले आहेत. यापैकी शेकडो विद्यार्थी हे महाराष्ट्र राज्यातील आहेत.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यात ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या संख्येने वाढली आहे. ७५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ४३ हजार ४४१ आहे. ९० टक्के अणि त्याहून अधिक गुण मिळणाऱ्यांची संख्या ही ७ हजार ३४४ इतकी असल्याने मुंबईत ९० टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यानाही प्रवेशासाठी चढाओढ करावी लागणार आहे.
मुंबई आणि परिसरातील अनेक नामांकित महाविद्यालयांचे बारावीचे निकाल हे १०० टक्के लागले आहेत. तर काहीमध्ये ९० टक्के विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य मिळाले आहे. यामुळे या विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयात प्रवेश मिळतील. मात्र, बाहेरील विद्यार्थ्यांना ही संधी मिळणे कठीण होण्याची शक्यता प्राचार्यांकडून व्यक्त केली जात आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या निकालाची गुणनिहाय टक्केवारी
९० टक्क्यांवर - ७३४४
८५ ते ९० टक्के - २१६२८
८० ते ८५ टक्के - ४३५०६
७५ ते ८० टक्के - ७१४६६
७० ते ७५ टक्के - ११४६२८
६५ ते ७० टक्के - १६१९०६
६० ते ६५ टक्के - २४०९४०
४५ ते ६० टक्के - ५८५०५६
४५ पेक्षा कमी - ६८९४१