मुंबई - अतिवृष्टीमुळे मुंबईत भांडूप, विक्रोळी, चेंबूर, चांदीवली या भागात दरड आणि भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य शासनाने मदत म्हणून जाहीर केलेले 5 लाख रुपये रक्कम कमी आहे. त्यात वाढ करून सांत्वनपर मदत म्हणून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन पब्लिक ऑफ इंडिया आठवले गटाने केली आहे.
'प्रत्येकी 10 लाख रूपये द्या'
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी चेंबूरच्या भारत नगर येथील बीएआरसीची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी भेट दिली. बीएआरसीची भिंत कोसळून 15 जण मृत्युमुखी पडले. विक्रोळी पंचशील नगरमध्ये 5 जण दरड कोसळून मृत्यूमुखी पडले आहेत. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना रिपाइं तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली गौतम सोनवणे यांनी वाहिली आहे. तसेच यावेळी त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये द्यावे, अशी मागणी केली आहे.
'मनपाने लक्ष द्यावे'
मुंबईतील डोंगराळ भागातील झोपडीवासीयांचे योग्य पुनर्वसन करावे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षातर्फे अनेक वेळा मुंबई मनपाकडे केली आहे. मुंबई मनपा मात्र पावसाळा आल्यानंतर जागी होती. झोपडीवासीयांकडे राज्य शासन आणि मुंबई मनपाने मानवतेच्या दृष्टीने पाहून झोपडीवासीयांचे सुरक्षितस्थळी कायमचे पुनर्वसन केले पाहिजे. पहिल्याच पावसात मुंबईत अनेक ठिकाणी दरड कोसळणे, भिंत कोसळणे अशा दुर्घटना घडल्या आहेत. पावसाळ्याचे अजून दोन महिने बाकी आहेत. या काळात आणखी दुर्घटना घडू नयेत, म्हणून राज्य सरकार आणि मुंबई मनपाने खबरदारी घ्यावी, असे आवाहन सोनवणे यांनी केले आहे.
हेही वाचा -मुंबईत पावसामुळे 21 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून ५ लाखांची मदत