मुंबई - पार्थ पवार हे लहानपणापासून फुले, आंबेडकर यांच्या विचारात वाढले आहेत. ते स्वतः आंबेडकरवादी विचारांचे आहेत, असा दावा रिपाइंचे (खरात गट) सचिन खरात यांनी केला आहे. मावळ मतदारसंघातून त्यांनी पार्थ पवार यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
प्रकाश आंबेडकरांनी सवता सुभा उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी छोट्या छोट्या रिपब्लिकन गटांना एकत्र करत आहे. त्याच पार्श्वभूमिवर मावळ येथे रिपाइंच्या खरात गटाने राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना पाठिंबा देऊ केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पवार यांची भेट घेऊन खरात यांनी त्यांचा पाठिंबा जाहीर केला.
राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत पार्थ पवार यांचे नाव जाहीर केले आहे. येथून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यावरुन राष्ट्रवादी पक्षांतर्गत बरीच खलबते झाली. याच कारणाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून स्वतःची उमेदवारी मागे घेतल्याचेही बोलले जात आहे. पार्थ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या प्रचाराला मतदारसंघात सुरुवात झाली आहे. फुले - आंबेडकरवादी विचारांच्या मतदारांनी पार्थ पवार यांच्या मागे उभे रहावे असे, सचिन खरात म्हणाले.