मुंबई - वढू गावात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला कोरेगाव भीमा दंगलीतील आरोपी मिलिंद एकबोटे यांना उपस्थित राहण्यास राज्य सरकारने बंदी घालावी अशी मागणी आरपीआय (खरात) गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे. या कार्यक्रमाला राज ठाकरे यांची भेट घेऊन उपस्थित राहण्याचे निमंत्रण एकबोटे यांनी दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर खरात यांनी ही मागणी केली आहे.
हेही वाचा - महाराष्ट्रातील सीआरपीएफ जवानाची तेलंगणामध्ये आत्महत्या..
पुण्याच्या कोरेगाव भीमा येथे इंग्रज आणि पेशव्यांमध्ये युद्ध झाले. त्यात इंग्रजांच्या सैन्यात असलेल्या महार सैनिकांनी पेशव्यांचा खातमा केला होता. या घटनेला १ जानेवारी २०१८ मध्ये २०० वर्ष पूर्ण झाली म्हणून, येथील विजय स्तंभाला आंबेडकरी अनुयायी अभिवादन करण्यासाठी गेले होते. विजय स्तंभाला अभिवादन केल्यावर संभाजी महाराजांच्या देहाचे अवशेष एकत्र करून त्यांना अग्नी देऊन समाधी बांधणाऱ्या गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीला आंबेडकरी अनुयायी भेट देतात. १ जानेवारीला २०१८ ला गायकवाड यांच्या समाधीवरून वाद निर्माण झाला. दोन समाजात निर्माण झालेल्या वादामुळे दंगल आणि जाळपोळ झाली. या दंगलीबाबत चौकशी सुरू असून त्यात मिलिंद एकबोटे हे आरोपी असल्याचा आरोप आहे.
मिलिंद एकबोटे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन येत्या २४ मार्चला होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भिमा कोरेगाव प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू असून दंगलीला मिलिंद मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे हे जबाबदार असल्याचा आरोप आंबेडकरी समाजाचा आहे. यामुळे पुण्याच्या वढू बुद्रुक गावातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला मिलिंद एकबोटे यांना हजर राहण्यास राज्य सरकारने बंदी घालावी अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे.
हेही वाचा - 'दूध भेसळखोरांना फाशी झाली पाहिजे'