मुंबई - विधानसभा निवडणुकीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना भाजप, शिवसेना महायुतीकडून 6 जागा सोडण्यात आल्या होत्या. त्यापैकी 2 जागा रिपाइंचे उपाध्यक्ष दिपक निकाळजे व मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे हे दोन पदाधिकारी लढवणार होते, तर 4 जागांवर महायुतीचे उमेदवार लढणार होते. मात्र, रिपाइंच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे रिपाइंला भोपळा मिळाला आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजप १४६, शिवसेना १२४, तर मित्र पक्षाला १८ जागा सोडण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. मित्र पक्षाला सोडण्यात आलेल्या जागांपैकी आरपीआयचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवेल यांच्या वाट्याला ६ जागा देण्यात आल्या होत्या. मानखुर्द शिवाजी नगरमधून रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, तर फलटणमधून रिपाइंचे उपाध्यक्ष दीपक निकाळजे निवडणूक लढवणार होते. पाथरी, नायगाव, माळशिरस, भंडारा या चार जागांवर भाजपकडून उमेदवार उभे केले जाणार होते. भाजपच्या चिन्हावर या सहाही जागा लढवल्या जाणार असल्याने रिपाइंचे सहा आमदार विधानसभेत जातील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती.
रिपाइंचे उपाध्यक्ष दिपक निकाळजे यांनी मुंबईच्या चेंबूर येथून उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना फलटण येथून उमेदवारी देण्यात आली. यामुळे निकाळजे यांनी फलटण येथून मिळालेली उमेदवारी नाकारली आहे. त्यांनी उमेदवारी अर्जच भरलेला नाही. मुंबईच्या मानखुर्द शिवाजी नगर येथून रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. याठिकाणी शिवसेनेचे विठ्ठल लोकरे यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. या मतदार संघामधून भाजपकडून सोनावणे यांना एबी फॉर्म दिला जाणार होता. मात्र, भाजपाकडून एबी फॉर्म न दिल्याने सोनावणे यांचा अर्ज अपक्ष म्हणून नोंद झाला होता. भाजप, शिवसेना आणि रिपाई यांची महायुती असल्याने सोनावणे यांना अर्ज मागे घेण्याचे आदेश रामदास आठवले यांनी दिले आहेत. त्यानुसार सोनावणे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
रिपाइंच्या दिपक निकाळजे व गौतम सोनावणे या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. यामुळे आता रिपाइंला मिळालेल्या ६ जागांपैकी ४ जागांवर महायुतीचे उमेदवार लढणार आहेत. रिपाइंला ६ जागा देण्यात आल्या तरी त्यापैकी एकाही जागेवर त्यांचा उमेदवार लढणार नाही.
महायुतीसाठी माघार -
राज्यात शिवसेनेचे उमेदवार उभे असलेल्या मतदारसंघात रिपाइंने दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत उद्धव ठाकरे आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यात चर्चा झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी मानखुर्द शिवाजीनगर येथे दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत विनंती केली आहे. मानखुर्द शिवाजीनगर मतंदारसंघातून गौतम सोनावणे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा. त्यांना पुढील काळात सत्तेत चांगली संधी देऊन त्यांचे सन्मानाने सत्तेत सहभाग देण्याचे आश्वासन रामदास आठवले यांनी दिले आहे. राज्यात रिपाइं भाजप शिवसेना महायुती अभेद्य असून महायुतीला विजयी करण्यासाठी रिपाई साथ देणार असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे. यामुळे रामदास आठवले यांचा आदेश मान्य करून आपण उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचे गौतम सोनावणे यांनी कळविले आहे.