मुंबई : खतांच्या वाढत्या किंमतीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. खतांच्या किंमती वाढवून केंद्र सरकार किसान सन्मान निधीची वसुली करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
सोशल मीडियावर पोस्ट टाकून रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. "खतांच्या किंमती भरमसाठ वाढवून 'किसान सन्मान निधी'चे पैसे तुघलकी पद्धतीने व्याजासह वसूल करायचं सरकारने ठरवलं की काय अशी शंका येते. कोरोनाच्या काळात उद्योगांचे कंबरडे मोडून बेकारी वाढत असताना शेती हेच एकमेव क्षेत्र आहे जे लोकांच्या जगण्याचा आधार बनलंय. अशा परिस्थितीत खतांच्या किंमती वाढवून हा आधारही सरकारने काढून घेऊ नये आणि या वाढीव किंमती तातडीने कमी कराव्यात, ही विनंती!" अशी एक पोस्ट त्यांनी टाकली आहे. तर "डीएपी मध्ये ५८%, एनपीके मध्ये ५०% तर एनपीएस मध्ये ४५% वाढ केल्याने ही खतं घेण्यासाठी 'पीएम किसान सन्मान निधी'चे सगळे पैसे खर्च केले तरी ते पुरणार नाहीत. #IFFCO कडील जुना साठा संपल्यास नव्या साठ्यातील खतांवर भाववाढ होणार नाही, याची हमी देणंही गरजेचं आहे." अशी दुसरी पोस्ट त्यांनी केली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने खतांच्या किमती वाढवल्याचा निषेध करतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली होती. तसेच केंद्र सरकारने खतांच्या किमती कमी केल्या नाही, तर राष्ट्रवादी राज्यभरात तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही दिला होता.