मुंबई - कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत शनिवारी (२० फेब्रुवारी) धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान रेस्टॉरंट, क्लब, जिमखाना, चित्रपटगृह इत्यादींमध्ये देखील धडक कारवाई करण्यात येऊन कोविड विषयक प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यावेळी मास्क न घालणाऱ्या १६ हजार १५४ व्यक्तींकडून प्रत्येकी रुपये २०० प्रमाणे एकूण रुपये ३२ लाख ३० हजार ८०० एवढी दंडवसुली करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत एकाच दिवसात करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान करण्यात आलेली ही लक्षणीय कारवाई आहे.
अंधेरी, वांद्रे परिसरात सर्वाधिक कारवाई
सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वावरताना प्रत्येकाने आपल्या चेहऱ्यावर 'मास्क' लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच, 'मास्क'चा वापर न करणाऱ्या नागरिकांवर रुपये २०० एवढी दंड आकारणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार, बृहन्मुंबई महापालिकेद्वारे 'मास्क' वापरण्या विषयक जनजागृती सातत्याने करण्यासोबतच याबाबत नियम न पाळणाऱ्या किंवा चेहऱ्यावर मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई ९ एप्रिल २०२० पासून नियमितपणे करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पालिकेकडून २० फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान महापालिकेच्या २४ विभागांपैकी अंधेरी (पश्चिम) येथील ‘के' पश्चिम विभागात सर्वाधिक म्हणजे २ हजार ३४५ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून ४ लाख ६९ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. या खालोखाल वांद्रे ‘एच/पश्चिम’ विभागात १ हजार १५९ व्यक्तींकडून रुपये २ लाख ३१ हजार ८०० इतका दंड वसूल करण्यात आला आहे. कुलाबा फोर्ट येथील ‘ए’ विभागात १ हजार ३० व्यक्तींवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून रुपये २ लाख ६ हजार एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. कुर्ला 'एल' विभागात ८८६ व्यक्तींवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून रुपये १ लाख ७७ हजार २०० एवढी दंड वसुली करण्यात आली आहे.
कारवाई करण्यात आलेले विभाग
'एफ' उत्तर विभागामध्ये ७४४ व्यक्तींकडून रुपये १ लाख ४८ हजार ८००, ‘एस’ विभागात ७४३ व्यक्तींकडून रुपये १ लाख ४८ हजार ६००, ‘जी' उत्तर विभागात ७०९ व्यक्तींकडून रुपये १ लाख ४१ हजार ८००, ‘के' पूर्व विभागात ७०७ व्यक्तींकडून रुपये १ लाख ४१ हजार ४००, ‘आर' मध्य विभागात ७०५ व्यक्तींकडून रुपये १ लाख ४१ हजार, ‘पी'उत्तर विभागात ७०३ व्यक्तींकडून रुपये १ लाख ४० हजार ६००, ‘एच' पूर्व विभागात ६३५ व्यक्तींकडून रुपये १ लाख २७ हजार, ‘जी' दक्षिण विभागात ६३१ व्यक्तींकडून रुपये १ लाख २६ हजार २००, ‘आर' उत्तर विभागात ६१६ व्यक्तींकडून रुपये १ लाख २३ हजार २००, ‘एफ' दक्षिण विभागात ६०२ व्यक्तींकडून रुपये १ लाख २० हजार ४००, ‘पी' दक्षिण विभागात ६०० व्यक्तींकडून रुपये १ लाख २० हजार, ‘एम' पश्चिम विभागात ५९७ व्यक्तींकडून रुपये १ लाख १९ हजार ४००, ‘एन’ विभागात ५८७ व्यक्तींकडून रुपये १ लाख १७ हजार ४००, ‘आर' दक्षिण’ विभागात ५७२ व्यक्तींकडून रुपये १ लाख १४ हजार ४००; तर ‘डी’ विभागात ५२१ व्यक्तींकडून रुपये १ लाख ४ हजार २०० एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. ‘टी’ विभाग परिसरातून ३५२ व्यक्तींकडून ७० हजार ४००, ‘सी’ विभाग परिसरातून २३७ व्यक्तींकडून ४७ हजार ४००, ‘बी’ विभाग परिसरातून २१३ व्यक्तींकडून ४२ हजार ६००, ‘एम/पूर्व’ विभाग परिसरातून १७८ व्यक्तींकडून ३५ हजार ६००; तर ‘ई’ विभाग परिसरातून ८२ व्यक्तींकडून १६ हजार ४०० रुपये एवढा दंड बिना मास्क प्रकरणी वसूल करण्यात आला आहे.
पालिकेचे आवाहन
बृहन्मुंबई महापालिकेद्वारे नागरिकांनी 'फेस-मास्क' वापरावा, यासाठी सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. तथापि, यानंतरही 'मास्क' वापरणे टाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जनजागृती व दंडात्मक कारवाई या दोन्ही बाबींमुळे सकारात्मक परिणाम साधला जाऊन व नागरिकांमध्ये प्रभावी जनजागृती साध्य होत आहे. परिणामी, कोविड–१९ ला आळा घालण्यासही मदत होत आहे. या अनुषंगाने नागरिकांनी घराबाहेर पडताना आवर्जून 'फेस-मास्क' घालूनच बाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.